बदलापूरः सालाबादाप्रमाणे यंदाही बदलापूर शहरात वामन म्हात्रे फाऊंडेशन आयोजीत वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तब्बल १२ हजार खेळाडूंनी या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. यावेळी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यंदाच्या वर्षात स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूर, आरोग्यदायी बदलापूर अशी संकल्पना घेऊन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
बदलापूर शहरात गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असलेली मानाची समजली जाणारी वर्षा मॅरेथॉन स्वातंत्र्य दिन्याच्या दिवशी संपन्न झाली. वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून या वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. सकाळपासूनच शहरात जागोजागो खेळाडूंचे जत्थे पाहायला मिळत होते. विविध गटात संपन्न होणारी ही स्पर्धा विविध ठिकाणाहून सुरू होते. त्यामुळे विविध ठिकाणच्या सुरूवातीच्या स्थानावर खेळांडूंनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील विविध भागातील हे धावण्याचे टप्पे पूर्ण झाले होते. तर महात्मा गांधी चौकात बक्षिस समारंभ संपन्न झाला. यावेळी आयोजन वामन म्हात्रे यांनी यंदा या स्पर्धेत तब्बल १२ हजार खेळांडूंनी सहभाग नोंदवल्याी माहिती दिली.
याप्रसंगी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. महाराष्ट्राच्या आणि शहराच्या भल्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कायमच सहकार्य केले आहे. त्यात वामन म्हात्रे यांनीही चांगले काम केले, असे मत व्यक्त केले. तर आम्ही स्पर्धा शहरात सुरू राहावी यासाठी कायमच प्रयत्नशील असतो. नागरिकांचाही आम्हाला चांगला पाठिंबा आहे त्यामुळे करोनाचे दोन वर्ष वगळता आम्ही इतके वर्ष मॅरेथॉन सुरू ठेवू शकलो, असे वामन म्हात्रे यावेळी म्हणाले. या स्पर्धेतखेळलेले अनेक जण आज पोलिस, सैन्य दलात आहेत, असेही म्हात्रे यावेळी म्हणाले.
तर बदलापुरच्या या मॅरेथॉन स्पर्धेत धावलेली रेश्मा राठोड पुढे खोखो विश्वचषक स्पर्धेत खेळली, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे मत यावेळी कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेसाठी विविध शाळा, महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते. त्यांचे पालक, शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.