Badlapur Crime : बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Crime ) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो आहे. त्याचप्रमाणे बदलापूरमधले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशी द्या अशी मागणी होते आहे. बदलापूर येथील रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी रेल रोको केला आहे. या प्रकरणी आता सुप्रिया सुळेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. नराधमाला फाशी द्या अशीच मागणी सुप्रिया सुळेंनही केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

एखादी घटना घडली तर नुसत्या बदल्या करुन प्रकरण (( Badlapur Crime )) सुटणार नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. जी घटना बदलापूरमध्ये घडली त्याचा मी जाहीर निषेध करते. अशा गोष्टी या फार संवेदनशील पद्धतीने हाताळायच्या असतात. त्यामुळे माध्यमांना आणि सगळ्याच जबाबदार लोकांना विनंती आहे की त्या मुलींची ओळख जाहीर करु नये. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे आणि या प्रकरणातल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला फाशी झाली तरच असं कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती बसेल. आज खाकी वर्दीची भीती उरलेली नाही, असं चित्र दिसतं. पोर्श कार प्रकरण झालं त्यातही काय काय घडलं ते पाहिलं तर कळतं.

हे पण वाचा- Badlapur Crime : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महिलांचा संताप; “तुमचे १५०० रुपये आणि लाडकी बहीण योजना नको, त्यापेक्षा..”

महिलांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे

महाराष्ट्राच्या पोलिसांचा मानसन्मान होतो, देशातले सर्वात चांगले पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीस आहेत. आता काय घडतंय याचं उत्तर हे गृहमंत्र्यांना द्यावं लागेल. बलात्काराच्या घटना घडत आहेत, महिलांविरोधातले अत्याचार वाढले आहेत. लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सरकार १५०० रुपये देतं आहे. त्या योजनेचं स्वागत करते, पण महिलेची सुरक्षितता ही पण सरकारची जबाबदारी आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

आज जनक्षोभ का उसळला याचा सरकारने विचार करावा

आज पोलिसांच्या विरोधात आणि जी घटना घडली त्याविरोधात जनक्षोभ का उसळला आहे? कारण ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या मुलींचे पालक १२ तास वणवण फिरत होते. पण एकाही पोलीस स्टेशननी दखल घेतली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा न्याय आहे का? शाहू, फुले ,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा न्याय आहे का? जर सरकार लेकींना न्याय देऊ शकत नसेल तर या असल्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

बदलापूरमध्ये महिलांचा संताप, सरकारविरोधात घोषणा बाजी (फोटो-ANI)

शाळा कुणाचीही असो, जर लेकीच्या विरोधात असा काही प्रकार घडत असेल तर कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी या आरोपीला वाचवण्याचा निर्णय घेतला असेल त्यांचे राजीनामे घ्या. बहिणींच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करत आहात? याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावं असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.