बदलापूर : बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी आता पूर्वेतील उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर जुन्या पालिका कार्यालयापर्यंत दुभाजक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात उड्डाणपुलावरून उतरणारी वाहने, स्थानकाकडून येणारी आणि जाणारी वाहने जागेवरच वळण घेत असल्याने कोंडी होत होती. त्यामुळे आता येथील कोंडी फुटण्याची आशा आहे.
बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यात वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात भुयारी मार्ग बंद असल्याने येथून जाणाऱ्या वाहनांचा भारही शहरातल्या एकमेव उड्डाणपुलावर पडत होता. परिणामी उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांसह शालेय विद्यार्थी आणि रूग्णांनाही बसला. सातत्याने कोंडी होत असल्याने वाहनचालकांत संतापाचे वातावरण होते. त्यानंतर उड्डाणपूल कोंडीमुक्त ठेवण्यासाठी पाऊले उचलली गेली.
भुयारी मार्गाच्या जोडरस्त्याचे काम वेगाने मार्गी लावून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे उड्डाणपुलावर होणारी कोंडी काही अंशी बंद झाली. मात्र पूर्वेला ज्या ठिकाणी उड्डाणपूल उतरतो त्या ठिकाणी काही कार्यालये, सर्वात मोठी शिक्षण संस्था आणि असंख्य रस्ते आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर वाहने वळण घेत असल्याने येथे कोंडी होत होती.
पश्चिमेतून येणारी वाहने कात्रप भागात जाण्यासाठी जागेवर उजवीकडे वळण घेत होती. त्यावेळी आदर्श शाळेकडून येणारी वाहने थांबत होती. तसेच बदलापूर पूर्वेतून येणाऱ्या रिक्षा स्थानकाकडे जाण्यासाठी वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरूनच वळण घेत नवरत्न हॉटेलकडे जात होती. त्यामुळे या भागात मोठी कोंडी होत होती.
त्यामुळे आता या उड्डाणपुलाच्या पूर्वेतील उतरणाच्या मार्गावर जुन्या पालिका कार्यालयासमोर दुभाजक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी या दुभाजकांचे काम जवळपास पूर्ण झाले होते. त्यामुळे आता पश्चिमेतून पूर्वेत येणाऱ्या वाहनचालकाला उड्डाणपुलाच्या तोंडावर उजवीकडे वळण घेता येणार नाही. तसेच पूर्वेतील वाहनचालकाला उड्डाणपुलाखालून स्थानकाकडे जावे लागेल.
कात्रप भागातून येणारा वाहनचालकही नवरत्न हॉटेलकडून येऊ शकणार नाही. या वळण घेण्याबाबत अद्याप वाहतूक पोलिसांनी आराखडा सादर केलेला नाही. यावर वाहनचालक आणि त्यातही रिक्षा चालक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र दुभाजकामुळे उड्डाणपुलाच्या तोंडावर होणारी कोंडी कमी होण्याची आशा आहे.