बदलापूर: नगरपालिका निवडणुकांचा संभाव्य घोषणा लक्षात घेऊन बदलापूर शहरात राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेनेने यात आघाडी घेतली असून संभाव्य उमेदवारांच्या घोषणांसह थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांच्या नावाची शिफारस शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेने आता उमेदवार निश्चितीमध्ये आघाडी घेतली आहे.
बदलापूर शहरात आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यंदाची पालिका निवडणूक तब्बल १० वर्षांनंतर होणार असल्याने सर्वच इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया संपन्न झाल्याने सर्वांना सुरक्षित प्रभागांची ओळख झाली आहे. परिणामी सर्वच पक्षांमध्ये प्रवेश सुरू आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने यात आघाडी घेतली आहे.
गेल्या काही दिवसात शिंदे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले आहेत. त्यात प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपतील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेकांना तयारीला लागण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहे. त्यानुसार शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी बहुतांश प्रभागातील संभाव्य उमेदवारांना प्रचार सुरू करण्याचे आदेश दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.
रविवारी शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी प्रभाग क्रमांक तीन येथे छोटेखानी कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. या प्रभागात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे पुत्र वरुण म्हात्रे पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहेत. येथे भाजपकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे रिंगणात असतील. त्यामुळे येथे शिवसेनेने निवडणुकीपूर्वी प्रचाराला सुरुवात केली आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर
शिवसेनेने प्रचारासह नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य नावाचीही घोषणा केली आहे. रविवारी शिवसेनेने पत्रकार परिषद घेत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या नावावर शहरातील पदाधिकाऱ्यांनी एकमत केले असूज त्यांचे नाव अंतिम मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूर शहरात शिवसेनेचा थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपकडून अद्याप नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. शहरात भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती जाहीर केली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची उमेवारी कुणाच्या खात्यात जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.