बदलापूरः बदलापूर गावातील अमृत टॉवर या गृहसंकुलात असलेल्या उद्यानात उघड्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन महिन्यांनंतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका रहिवाशाच्या घरी लग्नकार्य असल्याने त्यांनी विनापरवानगी मंडप सजावटवाल्याला बोलावून सजावटीचे काम केले होते. त्यावेळी विद्युत खांबाला बांधलेल्या लोखंडी तारा तशाच उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील रहिवासी रविंद्र भोईर आणि सजावटकार शंकर भोईर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पश्चिमेत बदलापूर गावात परिसरात असलेल्या अमृत टॉवर गृहसंकुलात ३१ मे रोजी राजवीर लोखंडे या १४ वर्षीय मुलाचा उद्यानातील उघड्या तारांच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला होता. तपासाअंती असे समोर आले की येथे विद्युत दिव्याला लोखंडी तारा बांधण्यात आल्या होत्या. त्यातून विजप्रवाह प्रवाहित होत असल्याने विजेचा धक्का लागला. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल ठाणे पोलीस आयुक्तालयाला घ्यावी लागली. त्यांनी परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाला याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
याच इमारतीत राहणारे रविंद्र भोईर यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाकरिता सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता सोसायटीच्या आवारात मंडप डेकोरेशन शंकर भोईर यांच्याकडून सजावट करून घेतली. यावेळी विद्युत खांबाला हायगाईने आणि निष्काळजीपणे लोखंडी तारा बांधण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या न काढता तशाच ठेवल्या.
हयगयीने आणि निष्काळजीपणे लग्नाकरीता लावलेले मोठे दिवे, प्रकाशयोजना काढल्यांनतर येथे लावलेल्या लोखंडी तारा काढण्यात आल्या नाही. त्यामुळे या तारेमध्ये अडकून विद्युत झटका लागून मुलाचा मृत्यु झालेला आहे, अशी फिर्याद मुलाच्या पालकांनी दिली. त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात रहिवासी रविंद्र भोईर, तसेच मंडप सजावटवाले शंकर भोईर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनांमध्ये वाढ
दोन दिवसांपूर्वी उल्हासनगर शहरात घराच्या छप्परावर ताडपत्री टाकण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा उघड्या वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यापूर्वी अंबरनाथमध्ये पाण्याच्या प्रवाहात उघड्या वाहिन्या पडलेल्या असताना त्यावर लघुशंका करण्यासाठी गेलेल्या तरूणाला अशाच प्रकारे जीवाला मुकावे लागले होते. तर जांभूळ गावात उघड्या विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने एका शेतकऱ्यासह दोन म्हशीही मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यामुळे या घटनांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी होते आहे.