बदलापूर: बदलापूर शहर तसेच परिसरातील नागरिक आणि स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दीर्घ काळापासून बदलापूर ते अक्कलकोट या बस सेवेची मागणी केली जात होती. ही मागणी अखेर मान्य झाली असून, नुकताच या नव्या बस सेवेचा शुभारंभ परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या हस्ते झाला.
ही सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातत्याने पाठपुरावा केला होता. पक्षाच्या वतीने तसेच बदलापूरमधील नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अखेर ही सेवा सुरू केली आहे. यामुळे बदलापूर परिसरातील नागरिकांना आणि स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना आता थेट अक्कलकोटला सहजतेने जाता येणार आहे.
बदलापूर शहरातील बस स्थानक तुलनेने इतर शहरातील बस स्थानकांपेक्षा लहान आहे. मात्र गेल्या काही वर्षात या बस स्थानकाला व्यापक रूप प्राप्त होते आहे. गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरातून राज्यातल्या विविध भागात थेट बस सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा दूरच्या प्रवाशांना होतो आहे. त्यासोबतच अनेक बस सेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. यातीलच एक मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासह अनेकांनी बदलापूर ते अक्कलकोट बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. नुकत्याच या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि नागरिकांचे तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “ही सेवा सुरू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,” असे मत या प्रसंगी अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
या बससेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या शुभारंभ सोहळ्याला काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शहराध्यक्ष किशोर पाटील, परिवहन मंडळाचे विभागीय उपव्यवस्थापक शिंदे, विठ्ठलवाडी डेपोचे अधिकारी गावडे , माजी नगरसेविका रुचिताताई घोरपडे, प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे, ज्येष्ठ कामगार नेते दादासाहेब पाटील, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सर्व स्वामीभक्तांना शुभेच्छा देत या उपक्रमामुळे अक्कलकोटच्या दर्शनासाठी होणारा प्रवास अधिक सुलभ होईल, असे सांगितले. नागरिकांनीही या बस सेवेचे स्वागत करत परिवहन विभाग आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.