वास्तू मोडकळीस, स्वयंपाकगृह, शौचालयांची बिकट अवस्था
लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ : रस्त्यांवरच्या भिक्षेकऱ्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी शासनाच्यावतीने भिक्षेकरीमुक्त अभियान राबवत त्यांची व्यवस्था शासकीय गृहात केली जाते. मात्र विविध ठिकाणच्या भागांतून गोळा केलेल्या या भिक्षेकऱ्यांना भग्नावस्थेत असलेल्या शासकीय वास्तूमध्ये ठेवले जात असल्याचे समोर आले आहे.
राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून भिकारी मुक्त अभियान हाती घेतले आहे. सार्वजनिक ठिकाणी भटकणाऱ्या शेकडो पुरुष आणि महिला भिक्षेकऱ्यांना पकडून त्यांना भिक्षेकरीगृहात ठेवण्यात येते. राज्य शासन महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यभर अशी भिक्षेकरीगृह चालवते. राज्यात सध्याच्या घडीला १४ भिक्षेकरीगृह आहेत. ठाणे जि’ाात असलेले एकमेव भिक्षेकरीगृह कल्याण तालुक्यातील जांभूळ या गावात आहे. अंबरनाथ शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर हे भिक्षेकरीगृह आहे. शासनाच्यावतीने १९७१ मध्ये याचे काम हाती घेण्यात आले होते. तर १९७२ पासून हे गृह सुरू करण्यात आले. गेल्या ४९ वर्षांत येथे हजारो भिक्षेकरी येऊन राहून गेले आहेत. मात्र गेल्या ४९ वर्षांत या भिक्षेकरीगृहाची डागडुजी करण्याची गरज शासनाला वाटलेली नाही. त्यामुळे सुमारे ५५ एकर परिसरात पसरलेल्या या भिक्षेकरीगृहाची सध्या पुरती दुरवस्था झाली आहे.
या भिक्षेकरीगृहात आजघडीला ४६ पुरुष भिक्षेकरी राहतात. या भिक्षेकरीगृहाची मुख्य वास्तू मोडकळीस आली आहे. छतावरील कौले फुटल्याने पावसळ्यात गळती रोखण्यासाठी येथे प्लास्टिकचे आवरण टाकावे लागते. तरीही भिक्षेकरी राहत असलेल्या खोल्यांमध्ये, स्वयंपाकघरात पाण्याची गळती सुरू असते. येथे जेवणाचे व्यवस्थापन एका खासगी कंपनीतर्फे केले जाते. त्यात मोजके भिक्षेकरी सहाकार्य करतात. मात्र बहुतांश भिक्षेकरी फक्त शून्यात नजर लावून बसलेले दिसतात. येथील शौचालयांची अवस्था भीषण आहे. या गृहाच्या परिसरात येथील कर्मचारी, डॉक्टर, अधिकारी यांचीही निवासस्थाने आहेत. मात्र त्यांचीही मोठय़ा प्रमाणावर वाताहत झाली आहे. त्यामुळे येथे एक कर्मचारी वगळता कुणीही वास्तव्यास नाही. काही महिन्यांपूर्वी येथे छतावर प्लास्टिकचे आवरण टाकणारा एक कर्मचारी कमकुवत छतावरून थेट खाली कोसळून जखमी झाला होता. तर छताची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे या वास्तूची वेळीच दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.
जांभूळमधील भिक्षेकरीगृह ४९ वर्षे जुने
कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे असलेल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या भिक्षेकरीगृहाची
अवस्था सध्या भीषण आहे. तब्बल ४९ वर्षे जुन्या वास्तूमध्ये सध्या हे गृह सुरू असूून
येथील छप्पर मोडकळीस आले आहे. स्वयंपाकगृह, शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ही वास्तू तातडीने दुरूस्त करण्याची गरज आहे.
डागडुजीसाठी ३५ लाख रुपयांची गरज
या भिक्षेकरी गृहाच्या वास्तूच्या डागडुजीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेद्र गायकवाड यांनी दिली आहे. यासाठी ३५ लाखांची गरज असून लवकरच त्याची डागडुजी केली जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे.
