अंबरनाथ: बारवी धरण परिसरात या वर्षी पावसाची सुरुवात मे महिन्यातच झाली होती. पश्चिम विक्षोभामुळे मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच हलका पाऊस पडला. त्यानंतर मे अखेरीस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धरण परिसरातील पाणलोट क्षेत्राला लवकरच ओलावा मिळाला. जून महिन्यात मोसमी पावसाची दमदार सुरुवात झाली आणि जुलै महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांपर्यंत पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा मे महिन्यात बाष्पीभवन होण्याचे प्रमाण जवळपास नगण्य राहिले आणि धरण लवकर भरून वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शेवटच्या टप्प्यात जुलै महिन्याच्या अखेरपासून पाऊस मंदावला. परिणामी ९ ऑगस्ट उजाडला तरी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहिले नाही.

मे महिन्यात कोसळणाऱ्या पावसाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने अचानक पाठ फिरवली. पावसाची ही साथ कमी झाल्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. शनिवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, बारवी धरणाची पातळी ७२.२४ मीटरवर पोहोचली आहे. धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर असून सध्या धरणात ३२६.११ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) पाणीसाठा आहे, जो एकूण क्षमतेच्या ९६.२४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात १२ मिमी पाऊस झाला असून, यंदा आतापर्यंत एकूण १९७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी, ९ ऑगस्ट २०२४ धरण ७२.६३ मीटर पातळीवर होते. तेव्हा पाणीसाठा ३३९.३८ एमसीएम म्हणजेच १००.१६ टक्के होता. तसेच त्या वर्षी आतापर्यंत २०७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावरून यंदाच्या पावसात आणि पाणीसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत किंचित घट असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी धरण भरू वाहू लागले होते. शनिवारी मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. त्यामुळे धरण भरण्याची प्रतिक्षाच आहे.

जुलै अखेरपर्यंत पाऊस जोरात असल्याने अनेकांनी धरण लवकर भरून वाहण्याची अपेक्षा केली होती. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून झालेल्या पावसाच्या कमतरतेमुळे ती शक्यता अद्याप पूर्ण झालेली नाही. पाणीसाठा समाधानकारक असला तरी, पावसाची ही अनिश्चितता लक्षात घेता पुढील काही दिवसांत पावसाची पुनरागमन होणे आवश्यक आहे. अन्यथा धरण ओव्हरफ्लो होण्याचा क्षण यंदा गेल्या वर्षापेक्षा उशिरा येण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी बारवी धरण महत्त्वाचे असल्याने त्यातील पाणीसाठ्यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या मध्यावर पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत, धरण ९६ टक्के भरले असले तरी गेल्या वर्षासारखे लवकर ओव्हरफ्लो होण्याचे चित्र नाही.