ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे नोटीफिकेशन २३ तारखे पर्यंत निघाले नाही. तर लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊ. दि. बा. पाटील यांचे नाव लावले नाही ना.. तर उद्घाटन करुन दाखवा. आमचे पाच हुतात्मे झालेत आणखी १५ व्हायला पण तयार आहोत. सरकारचे १२ वाजवून टाकू. आम्ही कायद्याने मागत आहोत. आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाही असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल असा इशारा देत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. या विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या विमानतळाला माजी खासदार दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून भूमिपुत्रांकडून केली जात आहे. परंतु केंद्रीय स्तरावर हालचाली होत नसल्याने रविवारी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक रॅली भिवंडी ते नवी मुंबईतील जासई पर्यंत काढण्यात आली. त्यानंतर एक मेळावा झाला. या मेळाव्यात म्हात्रे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. दि.बा. पाटील हे राष्ट्रीय नेते होते. विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी १५ वेळा पत्र लिहीले. त्यांनी ४ जूनला केंद्रीय मंत्र्यांनी एक पत्र देऊन हे प्रकरण विचाराधीन असल्याचे उत्तर दिले. ३० जुलैला हा विषय मी संसदेत घेतला. आमच्या प्रत्येक प्रश्नावर साधारण १५ दिवसांत उत्तर येणे अपेक्षित असते. परंतु आता सप्टेंबर सुरु आहे. अजूनही या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. केंद्रीय मंत्र्यांना भेटलो. त्यावेळीही विचाराधीन असल्याचेच उत्तर होते. त्यानंतर पाच दिवसांत विमानतळाबाबत बातम्या आल्या. मी १५ ते २० दिवस वाट पाहिली. पण एकाही नेत्याने पुढे येऊन प्रतिक्रिया दिली नाही की, या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या. मग मी ठरवले की, रॅलीचे आयोजन करावे.
दि.बा. पाटील यांना आता लोकनेते नाही तर राष्ट्रीय नेते म्हणायचे. हे प्रकरण आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांपर्यंत जायला हवे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल पाठविणार आहे. दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला का द्यावे हे त्यामध्ये मी लिहीणार आहे.
आम्ही रस्त्यावर उतरलो तर….
आमची ९० लाख लोकसंख्या आहे. ९० लाखांपैकी १० टक्के जरी उतरले ना, तरी विमानतळाची धावपट्टी अपुरी पडेल. रॅलीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले गेले आहे. येत्या दोन दिवसांत माझे नियोजन जाहीर करणार आहे, या १५ दिवसांत आणखी दोन आंदोलन करणार आहोत. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल. ते आंदोलन कसे असावे हे तीन दिवसांत कळविणार आहे. जर २३ तारखेपर्यंत नोटीफिकेशन निघाले नाही. तर २७ किंवा २८ तारखेला लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊ. दि. बा. पाटील यांचे नाव लावले नाही ना.. तर उद्घाटन करुन दाखवा. आमचे पाच हुतात्मे झालेत आणखी १५ व्हायला पण तयार आहोत. सरकारचे १२ वाजवून टाकू. आम्ही कायद्याने मागत आहोत. आमचा हक्क मागत आहोत, भीक नाही मागत. समाजाने ताकद दाखवली तर सलाम होईल आता ती वेळ आली आहे. एक व्हा, संघटीत व्हा, विजय निश्चित आहे दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिल्यास विमानतळाची उंची वाढणार आहे, कारण दि.बा. पाटील हे राष्ट्रीय नेते होते.
शरद पवारांचा सल्ला
मी आमचे नेते शरद पवार यांना रॅलीबाबत सांगितले. त्यावेळी त्यांनी मला सांगितले. दि.बा. पाटील हे खूप प्रामाणिक नेते होते. पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार असतानाही ते व्यक्ती लोकवर्गणीतून बांधलेल्या घरामध्ये राहत होते. त्यांनी किती मोठा त्याग केला. छोट्या मोठ्या आंदोलनाने हे होणार नाही. समाजाला सांगा ‘एक व्हा…’ असा सल्ला त्यांनी दिला.
नाईक कुटुंबाकडून प्रतिसाद नाही
मी प्रोटोकाॅल पाळणारा खासदार नाही. मी सर्व पक्षातील लोकांना संपर्क साधला. माझ्याकडे गणेश नाईक यांचा संपर्क क्रमांक नाही. पण मी त्यांच्या स्वीय साहाय्यकाला संपर्क साधला. नाईक यांनी भेटतो सांगितले पण भेट नाही दिली. मी संजीव नाईक यांना काॅल केला. पण भेट झाली नाही. वैभव नाईकांना संपर्क साधला. त्यांनी भेट दिली. ते मेळाव्यात उपस्थित होते असेही म्हात्रे यांनी सांगितले.