ठाणे : ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणातील आरोपीला रविवारी जामीन मिळाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप, मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. आरोपीला पुन्हा अटक करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. तर ठाकरे गट आणि भाजपने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याबाबत जाब विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित ११ वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पायी जात होती. त्यावेळी ५५ वर्षीय व्यक्तीने तिचा विनयभंग केला. या घटनेप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु, त्याला रविवारी जामीन मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी सायंकाळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली. तर, सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन आरोपीला जामीन मिळाल्याबाबत विचारणा केली. मंगळवारी मनसेचे नेते अविनाश जाधव हे मुलीच्या नातेवाईकांना घेऊन पोलीस ठाण्यात गेले होते. आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, मुलीच्या नातेवाईकांना धमकावले जात आहे. धमकी देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली.

हेही वाचा >>>डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू

बदलापूर अत्याचारप्रकरणी ज्याप्रमाणे बदलापूरमधील नागरिक एकवटले. त्याप्रमाणे ठाणेकरांनीही या प्रकरणात एकवटणे आवश्यक आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु, आरोपीला रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला जामीनदेखील मिळाला. आरोपीला पुन्हा अटक झालीच पाहिजे. -अविनाश जाधवमनसे नेते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mns thackeray groups are aggressive after getting bail for the accused who molested a minor girl thane news amy