ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध विवायाना माॅलची १९०० कोटी रुपयांना विक्री झाल्यानंतर त्याचे ‘लेक शोअर” माॅल असे नामकरण करण्यात आले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे शहराला लागूनच असलेल्या नवी मुंबईतील नालॅज पार्कची विक्री करण्यात आली आहे. पुणेस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर पंचशील रिअल्टी यांनी कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया (फ्रेंच आयटी कंपनीची भारतीय शाखा) यांच्याकडून ठाणे नॉलेज पार्क खरेदी केली असून या व्यवहाराची किंमत तब्बल ५५० कोटी रुपये इतकी आहे.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, पुणेस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर पंचशील रिअल्टी यांनी कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया (फ्रेंच आयटी कंपनीची भारतीय शाखा) यांच्याकडून ठाणे नॉलेज पार्क खरेदी करत करार केला आहे. या व्यवहाराची किंमत तब्बल ५५० कोटी रुपये इतकी असून मुंबईच्या व्यावसायिक मालमत्ता बाजारातील बदलत्या चित्रात ही महत्त्वपूर्ण भर मानली जात आहे.
सीआरई मॅट्रिक्स या रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स कंपनीनुसार, या मालमत्तेचे हस्तांतर प्राइम लोहगाव इन्फ्रास्पेसेस एलएलपी या पंचशील रिअल्टीच्या उपकंपनीकडे करण्यात आले आहे. या व्यवहारासाठी कंपनीने २७.५ कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. ही मालमत्ता १५.३८ एकर क्षेत्रफळावर पसरलेली असून, नवी मुंबईतील दिघी येथील इंडस्ट्रियल एरिया येथे ही मालमत्ता आहे. या ठिकाणी एकूण पाच इमारतींचा समावेश आहे. या व्यवहाराबाबत पंचशील रिअल्टी आणि कॅपजेमिनी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सध्या पंचशील रिअल्टीच्या कार्यालयीन प्रकल्पांचे एकूण मालमत्ता संग्रह २२.७७ दशलक्ष चौरस फूट एवढे आहे, तर ३२.१ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे प्रकल्प बांधकामाधीन आहेत. यात आठ टेक पार्क्स, पाच मिश्र-वापर प्रकल्प, दोन विशेष आर्थिक क्षेत्रे, तसेच डेटा सेंटर्स, निवासी प्रकल्प आणि हॉटेल्स यांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) भारताच्या कार्यालयीन बाजाराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरला आहे. नाईट फ्रँक इंडिया च्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत एमएमआरकडे १६९ दशलक्ष चौरस फूट इतका कार्यालयीन साठा असून, तो देशाच्या एकूण साठ्याच्या १७ टक्के आहे. ठाणे, नवी मुंबई, ऐरोली, बेलापूर या भागातील व्यावसायिक मालमत्तांची मागणी वाढताना दिसून येत आहे.