ठाणे : मुंब्रा येथील ठाणे महापालिका रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित व्यक्तींचे चित्रीकरण समजमाध्यमावर प्रसारित होत असल्याने त्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी विश्व हिंदू परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
मुंब्रा येथे ठाणे महापालिकेचे हकीम अजमल खान रुग्णालय आहे. तेथील रुग्णालयात दोघेजण उपचारासाठी आले होते. परंतु रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. तसेच मोठ-मोठ्याने आरडाओरड करत रुग्णालय परिसरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ही घटना ११ सप्टेंबर या दिवशी घडली होती. परंतु त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित झाले.
या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. या तक्रारींची दखल घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्या दोघांचा पोलीस शोध घेत असून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा कोणताही प्रकार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.