लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात शनिवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन सुनावणीसाठी पोलिसांनी हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाच्या बाहेर आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ४० स्त्री, पुरूष भाजप कार्यकर्त्यांविरूद्ध पोलिसांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह समर्थक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना हिललाईन पोलिसांनी अटक केली. सुरक्षेच्या कारणावरून आमदार गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यातील कोठडीत हलिवण्यात आले. तेथून त्यांची दूरदृश्यप्रणाली व्दारे सुनावणी घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती. परंतु, आमदार गायकवाड हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याने न्यायालयाच्या सूचनेवरून आमदार गायकवाड यांना पोलीस वाहनाने उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले.

आणखी वाचा-कल्याण मधील बांधकाम व्यावसायिकाकडून शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा; व्दारलीतील इतर ७० ग्रामस्थां विरूध्दही गुन्हे

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उल्हासनगर शहरात मनाई आदेश असताना कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या कार्यकर्त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases registered against bjp workers for slogans in support of mla gaikwad in ulhasnagar mrj
First published on: 05-02-2024 at 10:39 IST