कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गणेशघाट, खाडी किनारे, नदी किनाऱ्यांवर सोमवारी संध्याकाळी परप्रांतीय श्रध्दाळूंनी छट पूजा उत्साहात साजरी केली. यावेळी नदी, खाडी किनारी फटाक्यांचा धूमधडाका, ढोलताशांच्या गजराने वातावरण गजबजून गेले होते. विविध रंगी पेहरावात महिला, पुरूष, मुले, बालके या उत्सवात सहभागी झाली होती.
कल्याण जवळील शहाड मोहने येथील उल्हास नदी काठी, दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाट, खंबाळपाडा सागर किनारा मंदिर, डोंबिवलीत मोठागाव गणेशघाट, कोपर येथील गणेशघाट, देसई खाडी, शिळफाटा रस्त्यावरील श्री खिडकाळेश्वर मंदिर तलाव परिसरात उत्तरभाषिक समाज अधिक संख्येने छट पूजेच्या निमित्ताने एकवटला होता. घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही. चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागातून उत्तर भाषिक कुटुंबातील प्रमुख डोक्यावर बांबूची टोपली आणि त्यावर सोहळ ठेऊन वाजत गाजत मिरवणुकीने छट पूजेसाठी गणेशघाट, नदी, तलावांच्या किनारी जात होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर सुरू होता. अनेक श्रध्दाळू हातात तुरा आलेले उसाचे कांडे घेऊन विविध प्रकारचे अविष्कार करत ढोलताशांच्या तालावर नाचत होते. सोमवारी संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या तशा पावसात भिजत भाविक छट पूजेमध्ये व्यस्त होते.
पावसाचा जोर ओसरल्यावर प्रत्येक भाविकाच्या हातात पेटता दिवा होता. त्यामुळे काळोख्या अंधारात या पेटत्या दिव्यांचे विहंगम दृश्य दिसत होते. कल्याण पूर्वेतील पिसवली, आडिवली ढोकळी, नेवाळी, गोळवली भागात उत्तर भाषिक वर्ग सर्वाधिक आहे. या वस्तीमधील बहुतांशी नागरिक छट पूजेसाठी शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळेश्वर मंदिर येथे आला होता. मोहने, आंबिवली, शहाड, कल्याण शहरातील काही नागरिक मोहने उल्हास नदी काठी एकत्रित आला होता. काही नागरिकांनी दुर्गाडी किल्ला येथे गणेशघाटावर एकत्र येऊन छटपूजेचा आनंद लुटला.
संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडलेले इतर समाजातील नागरिक या उत्सवी सोहळ्यात सहभागी झाले होते. पलावा परिसरातील नागरिकांनी खिडकाळेश्वर मंदिर येथे छटपूजेसाठी जाणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत छट पूजेचे कार्यक्रम खाडी किनारा, नदी, तलावांच्या किनारी सुरू होते. कार्यक्रमानंतर खाडी किनारे, नदी, तलावांच्या काठी निर्माल्यांचे ढीग साचले होते. फटाक्यांचा कचरा पडला होता. हे सर्व निर्माल्य, फटक्यांचा कचरा दुसऱ्या दिवशी पालिका सफाई कामगारांनी उचलून नेला.
