ठाणे : घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्ड्याचा पहिला बळी गेला असून याच मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची कानउघाडणी केली. अशी घटना यापुढे घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना विचारणा केली. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची कानउघाडणी केली. अशी घटना परत घडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तात्काळ रस्त्यांची डागडुजी करा असे आदेशही त्यांनी दिले. मृत मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन योग्य ती मदत देण्याची सूचनाही त्यांनी केली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्तक रहा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे पालक सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त जय जीत सिंह, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde criticised officers on potholes issue asj