लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील शिवशाही मित्र मंडळ कार्यालयासमोरील सिमेंट काँक्रीटचा नवाकोरा रस्ता शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्याने नागरिक, वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंबिवली एमआयडीसीत ‘एमएमआरडीए’कडून अतिशय संथगतीने काँक्रीटचे रस्ते बांधणी सुरू आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. या संथगती कामांमुळे उद्योजक, रहिवासी, पादचारी हैराण आहेत. एमआयडीसीतील डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील शिवशाही मित्र मंडळ कार्यालयासमोरील काँक्रीटचा नवाकोरा रस्ता शुक्रवारी सकाळपासून जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यास सुरुवात केली.

अचानक रस्ते खोदकाम सुरू करण्यात आल्याने परिसरातील रहिवासी, जागरुक नागरिकांनी त्यास विरोध केला. नवा कोरा रस्ता का तोडण्यात येत आहे, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. त्यावेळी काँक्रीट रस्त्याखालून सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून येणारी रस्त्या खालील एक रासायनिक सांडपाणी वाहिनी सिमेंट रस्त्याच्या दबावामुळे तुटली आहे. रस्त्याखाली रासायनिक पाण्याची गळती सुरू झाली आहे. ही गळती वेळीच थांबविली नाहीतर पावसाळ्यात हे काम हाती घेणे अवघड होणार आहे. ही गळती रस्ते खराबीला कारणीभूत होण्याची शक्यता उपस्थित अधिकाऱ्याने वर्तविली. त्यामुळे काँक्रीटचा नवा कोरा रस्ता जेसीबीने तोडण्यास सुरुवात झाली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा… Mira Road Murder : “मनोज साने माझा मामा आणि तो खूप…”, सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर

एमआयडीसीत काँक्रीट रस्ते बांधण्यापूर्वी या भागातील जलवाहिन्या, महावितरण, दूरसंचार, महानगर गॅस अशा सेवा वाहिन्यांसाठी रस्त्यांच्या बाजुला स्वतंत्र सेवा वाहिनी मार्गिका तयार करण्यात यावी. जेणेकरुन या भागात नवीन सेवा वाहिन्या टाकायच्या असतील, त्या स्थलांतरित करायच्या असतील तर त्यासाठी रस्ता खोदकाम न करता ही कामे प्राधान्याने करता येतील. तसेच काँक्रीट रस्त्यांखाली १०० मीटरवर सेवा वाहिन्यांसाठी मोकळी मार्गिका ठेवण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली होती. यामधील एकही मागणी कंत्राटदार कंपनीने मान्य केली नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा… Mira Road Murder: सरस्वती वैद्यची हत्या ‘कॉपीकॅट क्राईम’चा प्रकार? श्रद्धा वालकर प्रकरणाशी किती साधर्म्य?

एमआयडीसीत नियमित विविध प्रकारची सेवा वाहिन्या टाकणे, स्थलांतरित करण्याची कामे नियमित केली जाणार आहेत. अशा प्रत्येक वेळी रस्ते फोडून कामे करण्यात येत असतील तर केलेल्या कामाचा खर्च, श्रम वाया जाणार आहेत. येत्या पावसाळ्यात ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका एमआयडीसीतील नागरिकांना बसणार आहे, असे रहिवाशांनी सांगितले. या रस्ते खोदकामाविषयी कोणी अधिकारी, ठेकेदार काही बोलण्यास तयार नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens expressed their displeasure over the excavation of a new concrete road in dombivli midc dvr