लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: येथील गोखले रोड आणि नौपाडा भागातील अंतर्गत रस्त्यांवर बसविलेले दुभाजक व्यापारी आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हटविले असून त्यापाठोपाठ आता इतर भागात बसविण्यात आलेल्या दुभाजकही हटविण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. अरुंद रस्त्यांवर बसविलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी वाढण्याची भिती व्यक्त करत नागरिकांनी त्यास समाजमाध्यमातून विरोध दर्शविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पालिका विरुद्ध नागरिक असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे स्थानक परिसरातून शहराच्या इतर भागात बस आणि रिक्षांची सतत वाहतूक सुरू असते. ही वाहने ठाणे स्थानक, बी-केबीन, गोखले रोड, राम मारुती रोड, तीन हात नाका या मार्गे वाहतूक करतात. या अरुंद मार्गावरून अनेक चालक वेगाने रिक्षा चालवितात. काहीवेळेस मार्गावर कोंडी असेल तर विरुद्ध मार्गावरून वाहतूक करतात. यामुळे कोंडीत भर पडून या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने येथे दुभाजक बसविण्याचा निर्णय घेऊन त्या कामास सुरूवात केली आहे.

हेही वाचा… डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यांवर खड्डे कायम; पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी

गोखले रोड, राम मारूती रोड परिसरात बसविण्यात आलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर काही व्यापाऱ्यांनी आणि भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनैश जोशी यांनी रस्त्यावर उतरून येथील दुभाजक काढून फेकून दिले होते. महापालिकेने दुभाजक बसविताना वाहतूक पोलिसांना कळविले नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीविषयी व्यापाऱ्यांकडून टिका होत होती.

हेही वाचा… राज्यमार्गाशेजारीच्या अतिक्रमणांवर एमआयडीसी कार्यालयाकडून कारवाई, अतिक्रमणमुक्त रस्ता ठेवण्याचे आव्हान

नौपाडा परिसरातील अनेक अंतर्गत मार्गावर असे दुभाजक बसविण्यात येत आहेत. अशाचप्रकारे उथळकर भागातील एका अरुंद मार्गावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. शाळेच्या बसगाड्यांचीही वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. दुभाजक बसविण्यात आल्यामुळे येथे वाहतूक कोंडी वाढली असून त्याचा परिणाम परिसरातील इतर मार्गावरील वाहतूकीवर होत आहे. याच मुद्दयावरून नागरिक आता समाजमाध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करू लागले असून त्यात याठिकाणी बसविलेले दुभाजक हटविण्याची मागणी करीत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens opposition to installation of dividers on internal roads in thane dvr