कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. समज देऊनही शिक्षक वेळेत शाळेत येत नसेल तर अशा शिक्षकांना निलंबित करा, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी पालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी कल्याणमधील धाकटे शहाड, घोलपनगर भागातील मिलिंदनगर, बारावे येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या मराठी शाळांना भेटी दिल्या. या भेटीच्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांची स्थिती, शाळेची इमारत, शाळेतील भौतिक सुविधा, शाळा परिसरातील पटांगण, खेळ साहित्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या शाळांमध्ये भरलेल्या विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पांची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या प्रकल्पांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांविषयी प्रश्न करून आयुक्त डाॅ. जाखड यांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्ये जाणून घेतली.

हेही वाचा…`डिजिटल अरेस्ट’ ठाणेकरांची अवघ्या ११ महिन्यांत सात कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक

विद्यार्थ्यांचा क्रमिक अभ्यासक्रम विहित वेळेत पूर्ण झाला पाहिजे. यासंदर्भात मुख्याध्यापक, शिक्षकांनी तत्पर असले पाहिजे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल यादृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी शाळाप्रमुख, शिक्षकांना केल्या. शाळेत नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या, प्रसंगी त्या शिक्षकाला निलंबित करा. विनापरवानगी गैरहजर, रजेवर राहणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करण्याबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना दिले.

हेही वाचा…म्हाडाची आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना, विरार, कल्याण, ठाण्यातील १४ हजार घरे प्रतिसादाविना पडून

पालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. शाळेतील शैक्षणिक सुविधा सुसज्ज ठेवणे, शाळेची इमारत सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासनाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner dr indurani jakhar ordered strict action against regular absence of teachers sud 02