ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपखाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख १७ हजारांच्या आसपास दुबार मतदार असल्याच्या तक्रारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आल्या होत्या. परंतु संपुर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ १३ हजारच दुबार मतदार असल्याचा दावा करत ही नावे वगळण्याची मागणी मुख्य निवडणुक आयोगाकडे केल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सत्ताधारीसह विरोधकांकडून होणारे आरोप आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला दावा यामुळे जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीचा संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाक़डून मतदार याद्या तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. या याद्यांमधील त्रुटी संदर्भात तक्रारी नोंदविण्याकरिता प्रशासनाने मुदत देऊ केली होती. या मुदतीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते राजन विचारे आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दुबार मतदारांबाबत तक्रार नोंदविली होती. परंतु या तक्रारींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपुर्वी केला होता.

हे ही वाचा…‘मापात पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर कारवाई

ठाणे लोकसभा मतदार संघातील ठाणे, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपखाडी, बेलापूर, ऐरोली या सहा विधानसभा मतदार संघात १ लाख ९३ हजाराहून अधिक दुबार मतदार नोंदणी झाल्याचा आरोप विचारे यांनी केला होता. या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढत ही नावे वगळण्याची मागणी केली होती. तसेच ही नावे वगळली नाही तर न्यायालयात दाद मागावी लागेल असा थेट इशारा दिला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कळवा मुंब्रा मतदार संघात २४ हजाराहून अधिक दुबार मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला होता.

हे ही वाचा…परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. ही नावे निवडणूक अधिकाऱ्यांनी वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. असे असतानाच, संपुर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ १३ हजारच दुबार मतदार असल्याचा दावा अशोक शिनगारे यांनी केला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन दुबार मतदार शोधण्यात आले. त्यामध्ये १३ हजार दुबार मतदार असून ही नावे वगळण्याची मागणी मुख्य निवडणुक आयोगाकडे केल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले.

दुबार मतदार आकडेवारी

भिवंडी – १८८६
मिरा-भाईंदर – १८२८

ओवळा-माजिवडा – १२९४
कोपरी-पाचपखाडी – १२२३

कळवा-मुंब्रा – ५८७२
ऐरोली – १३२९

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over double voter registration persists due to allegations from ruling party and opposition sud 02