ठाणे : देशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोनच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे. त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचे की कोणत्या इयत्तेपासून करायचे, याबाबत समिती राज्यभरातील जनतेचा कौल ऑनलाइन पद्धतीसह विविध माध्यमांतून अजमावणार असल्याचे असे प्रतिपादन राज्य सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले आहे. त्यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकार तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असून, त्यास काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी संघटनात्मक आढावा बैठक गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीआधी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकार तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असून, त्यास काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व भाषा एकत्र नांदाव्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तिसरी भाषा सक्तीची करण्याचा घाट घालत असून, ही मराठीच्या अस्तित्वावर गदा आणणारी कारवाई आहे. काँग्रेसने याला सुरुवातीपासून विरोध केला असून १७ एप्रिलला याविरोधात आंदोलनही केले होते. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारसींमधून तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सकपाळ यांनी केला. मराठीचा सन्मान अबाधित ठेवून सर्व भाषा संविधानातील अनुसूची-८ नुसार समृद्ध व्हाव्यात, ही काँग्रेसची भूमिका आहे. महाराष्ट्रातील सर्व भाषा हातात हात घालून एकत्र नांदाव्यात. एका भाषेला दुसऱ्या भाषेच्या विरोधात उभे करण्याचा काहीही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचा विश्वासघात
समितीतील सदस्यही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दबावाखाली निवडले गेले असून, या शिफारशी महाराष्ट्राच्या हिताविरोधात आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे गरजेचे आहे. देशाचा पंतप्रधान होण्यासाठी फडणवीस हिंदी भाषिक पट्ट्यात स्वतःला स्वीकारून घ्यावं म्हणून मायबोली मराठीच्या गळ्याला चाकू लावत आहेत. हा महाराष्ट्राचा विश्वासघात असून, काँग्रेस याला कडाडून विरोध करत राहील, असेही ते म्हणाले.