डोंबिवली – आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी डोंंबिवली जवळील २७ गावातील गोळवली येथील राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ पदाधिकारी डाॅ. वंडार पाटील यांनी शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश बाबुराव पाटील आणि आपल्या हत्येचा कट रचला आहे. यासंदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्यातील दामत गावातील एका इसमाला हत्येची सुपारी दिली आहे, अशी तक्रार डोंबिवलीतील विकासक आणि श्री साई एन्टरप्रायझेसचे संचालक सुजित मनोहर नलावडे (४८) यांंनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बुधवारी केली आहे.
विकासक सुजित नलावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोळवली येथील डाॅ. वंडार पाटील यांच्या विरूध्द आणि हत्येची सुपारी घेतलेल्या रायगड जिल्ह्यातील दामत गावातील मुझम्मिल या इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. डाॅ. वंडार पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सर्व पक्षीय संघर्ष समितीचे अनेक वर्ष पदाधिकारी होते.
सन २००७ मध्ये डाॅ. वंडार पाटील यांच्या मुलाची गोळवली ग्रामपंचायतीत बसले असताना हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. यामध्ये माजी नगरसेवक महेश पाटील यांचा सहभाग होता. अलीकडेच विजय पाटील खून खटल्याचा निकाल लागला. या खटल्यातून महेश पाटील यांची निर्दोष सुटका झाली.
सुजित नलावडे यांनी पोलीस ठाण्यातील क्रारीत म्हटले आहे, मी आणि महेश पाटील आमचा मालमत्ता विक्री व्यवहाराचा व्यवसाय आहे. श्री साई एन्टरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय करतो. डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्त्यावर जयहिंद काॅलनी दीप्ती पॅलेस येथे आमचे कार्यालय आहे. पाच वर्षापूर्वी मी एका प्रकरणात तळोजा कारागृहात होतो. तेथे न्यायबंदी अर्जुन देशमुख यांच्याशी माझी ओळख झाली. सन २०२० मध्ये मी कारागृहातून सुटलो. विजय पाटील हत्या प्रकरणात माझ्या व्यवसायातील भागीदार महेश पाटील आरोपी होते. त्यांना मी न्यायालयीन कामात मदत करतो, असा संशय विजयचे वडील डाॅ. वंडार पाटील यांना होता. त्यांना माझ्या बद्दल खूप राग होता.
गेल्या जूनमध्ये आपला मित्र अर्जुन देशमुख आपल्या डोंबिवलीतील कार्यालयात आला. त्याने आपणास वंडार पाटील, रायगडचा मुझम्मिल हे तुमच्या हत्येचा कट रचत आहेत असे सांगितले. मुलाच्या खुनाचा बदला वंडार पाटील यांना घ्यायचा आहे, असे सांगितले. अर्जुन देशमुख हे प्रकरण तयार करत होता. वंडार आणि सहकाऱ्याने तु सुजित, महेशची हत्या का करत नाहीस असे प्रश्न अर्जुनला केले. त्या दोघांना पोलीस, खासगी शस्त्रधारी संरक्षण आहे, असे अर्जुनने सांगितले.
महेश तुझ्या टप्प्यात येत नसेल तर त्याचा मुलगा साईश याची तू हत्या कर म्हणजे मुलाच्या मरणाचे दुख काय असते ते त्यांना कळेल असे वंडार पाटील यांनी अर्जुनला सूचविले. अर्जुन हे काम करत नसल्याने आणि त्याचा संशय आल्याने वंडार यांनी ते काम मुझम्मिल यांच्याकडे सोपविले. हत्येच्या कटाचे वंडार, मुझम्मिल मधील संभाषण अर्जुनने सुजित यांना ऐकवले, असे तक्रारीत आहे.
ऑगस्टमध्ये शस्त्रधारी बोलावून त्यांनी आपल्या कार्यालयाची टेहळणी केली होती. त्यामुळे ते कधीही महेश, त्यांचा मुलगा साईश आणि माझी हत्या करतील. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार सुजित नलावडे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मझम्मिल यांना सतत संपर्क केला. त्यांचे तिन्ही मोबाईल बंद आहेत.
मी वर्षभर आजारी आहे. काही महिने मी मुंबईत रुग्णालयात होतो. आपण कधी कोणाला संपर्क केला नाही. कधी बाहेर पडलो नाही. मुलाचे दुख आम्ही पचवले. त्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी, आपली बदनामी करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र आहे.- डाॅ. वंडार पाटील, राष्ट्रवादी पदाधिकारी.