Premium

डोंबिवलीत सुनीलनगरमध्ये ‘ग’ प्रभाग कार्यालयासमोर बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात एका भूमाफियाने पालिकेच्या ग प्रभाग कार्यालया समोर बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

building
(सुनीनलगरमध्ये पालिकेच्या ग प्रभाग कार्यालयासमोरील बेकायदा इमारतीचे बांधकाम.)

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात एका भूमाफियाने पालिकेच्या ग प्रभाग कार्यालया समोर बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. दिवसाढवळ्या पालिका अधिकाऱ्यांसमोर भूमाफियांकडून बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू असताना ग प्रभागाचे बीट मुकादम, नियंत्रक कनिष्ठ अभियंता यांना हे बेकायदा बांधकाम दिसत नाही का, असे प्रश्न परिसरातील रहिवासी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आक्रमकपणे कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी १० प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे डोंबिवलीतील फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप आणि त्यांच्या पथकाने गावदेवी मंदिर येथील बेकायदा इमारत भुईसपाट केली. ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेह कर्पे यांनी कुंभारखाणपाडा हरितपट्टयातील बांधकामांवर कारवाई केली. राहुलनगर मधील माफियांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. बेकायदा बांधकामांच्या विरुध्द प्रशासन आक्रमक झाले असताना डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमध्ये सर्वोदय सृष्टी इमारत दोनच्या जवळ आणि पालिका मलनिस्सारण केंद्रा जवळ, ग प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून ४०० मीटर अंतरावर नांदिवली गावातील एका भूमाफियाने सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर नागरी वस्तीत दारूचे अड्डे, महिला, शाळकरी विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त

या बांधकामाच्या तिसऱ्या माळ्याचे काम आता वेगाने सुरू करण्यात आले आहे. घाईने ही इमारत बांधून पूर्ण करायची. तेथे रहिवास सुरू करायचा, असे भूमाफियाचे नियोजन आहे. याच माफियाने गेल्या सात वर्षापासून गांधीनगर, पी ॲन्ड टी काॅलनी, नांदिवली, देसलेपाडा भागात २० हून अधिक बेकायदा इमारती कल्याण डोंबिवली पालिकेचे तत्कालीन उपायुक्त, एका पालिका कामगाराच्या सहकार्याने उभारल्या आहेत, अशी माहिती या भागातील काही जुन्या रहिवाशांनी दिली.

हेही वाचा >>>डोंबिवली लोकल मधील महिला डब्यात पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी, महिला प्रवासी त्रस्त

ग प्रभागाच्या हद्दीत यापूर्वीच आयरे गाव हद्दीत माफियांनी १५ हून अधिक बेकायदा टोलेजंग इमारती बांधून सज्ज केल्या आहेत. आरक्षित भूखंडावर मोबाईल मनोरे उभारले आहेत. या इमारती, मनोऱ्यांवर तत्कालीन साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी कारवाई केली नाही. त्यानंतर आलेल्या साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी या बेकायदा बांधकामांवर कारवाई प्रस्तावित केली होती. त्यांची बदली झाली. या बेकायदा बांधकामांवर अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे भूमाफियांना बळ मिळत असल्याने त्यांनी पुन्हा ग प्रभाग हद्दीत प्रभाग कार्यालयाच्या समोर बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली आहे. ग प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने या बांधकामाची माहिती घेऊन ती भुईसपाट करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याने सुनीलनगर मध्ये सर्वोद्य सृष्टी इमारत दोनच्या बाजुला आम्ही नवीन इमारत बांधकामाला परवानगी दिली नाही, असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Construction of illegal building in front of c ward office in sunilnagar in dombivli amy

First published on: 13-09-2023 at 15:58 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा