ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून त्याचबरोबर राज्य शासनाकडून मिळालेल्या ५ कोटी ४५ लाखांच्या निधीतून ठाणे महापालिका शहरातील प्रमुख रस्त्यांसह झोपडपट्टी भागांमध्ये कंटेनर शौचालयांची उभारणी करीत आहे. एकूण ३० ठिकाणी सुरू असलेली ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही महिन्यांत या शौचालयांची सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील रस्त्यांचे नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर प्रकल्पांची कामे ठाणे महापालिकेने हाती घेतली असून त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून या कामांसाठी राज्य सरकारने पालिकेला निधी दिला आहे. असे असले तरी शहरातील प्रमुख रस्ते आणि झोपडपट्ट्यांमधील काही भागांमध्ये शौचालयांची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांसह झोपडपट्टी भागांमध्ये ३० कंटेनर शौचालयांची उभारणी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे या प्रकल्पासाठीही राज्य सरकारने ५ कोटी ४५ लाख ६७ हजार ३०० रुपयांचा निधी मंजुर केला होता. हा निधी प्राप्त होताच ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील ३० ठिकाणी कंटेनर शौचालय उभारणीचे काम हाती घेतले. या शौचालयांच्या ठिकाणी पाण्याची टाकी बसविण्यात आली असून त्याद्वारे शौचालयांमध्ये सतत पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ज्याठिकाणी मलवाहिन्यांना कंटेनर शौचालयांची मलवाहिनी जोडणे शक्य आहे, त्याठिकाणी त्या जोडण्याचे काम सुरू आहे. तर ज्याठिकाणी मलवाहिनी जोडणे शक्य नाही, त्याठिकाणी मलटाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा – तंत्रशिक्षण संस्थांतील प्रवेशासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; एआयसीटीईकडून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक

वागळे इस्टेट येथील रामनगर भागात एक शौचालय सुरू झाले आहे तर, उर्वरित शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही महिन्यांत या शौचालयांची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पटेल समाजाची मागितली माफी, वाचा नेमकं काय घडलं ते….

कंटेनर शौचालय आकडेवारी

प्रभाग समिती – शौचालये संख्या – युनीट संख्या

नौपाडा-कोपरी – ४ – २४

माजिवाडा-मानपाडा – ४ – २८

वागळे इस्टेट – ६ – ३२

वर्तकनगर – ३ – २०

लोकमान्य-सावरकर – ४ – २४

कळवा – २ – २०

मुंब्रा – ४ – १६

दिवा – ३ – १८

एकूण – ३० – १८२

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container toilets in slums along major roads in thane ssb