ठाणे : सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ामधील पदाधिकारी आणि सदस्यांच्या विविध  तक्रारींचे निवारण करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायटय़ांसाठी ‘सहकार संवाद’ हे तक्रार निवारण पोर्टल सुरू केले असून याद्वारे २४ तासांच्या आत तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. तसेच या पोर्टलमुळे घरबसल्या आता नागरिकांना तक्रारी करणे शक्य होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी नवी मुंबई फेडरेशनचे सरचिटणीस भास्कर म्हात्रे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ांमधील विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रारदाराला निबंधक कार्यालय आणि सरकारी कार्यालयात जावे लागते. परंतु अनेक खेटे घालूनही त्यांच्या तक्रारीचे निवारण होत नाही. यामुळेच काहीजण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. अनेक तक्रारी उशिरा आल्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायटय़ांसाठी ‘सहकार संवाद’ हे तक्रार निवारण पोर्टल सुरु केले आहे.

हेही वाचा >>>रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला, मंडपातील एसी-पंखे बंद? ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा संताप

आमची संस्था आमचे प्रश्न अशी या पोर्टलची टॅगलाईन आहे. या पोर्टलवर २७ प्रकारच्या तक्रारींचा समावेश असून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांचे २४ तासांच्या आत निवारण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. तक्रारदारांना योग्यवेळेत तक्रारी करता याव्यात, त्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण व्हावे या उद्देशातून हे पोर्टल सुरु केले असून या पोर्टलवर तक्रार नोंदवण्यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रार निवारण पोर्टलचे लोकार्पण नुकतेच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. या पोर्टलवर तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित तक्रारदाराला तक्रार मिळाल्याची पोहच दुरध्वनी क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर प्राप्त होणार आहे. ही तक्रार पुढील कारवाईसाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाणार आहे. अधिकाऱ्यांकडून वेळेत तक्रारीचे निवारण झाले नाही, तर त्या तक्रारीचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. तसेच संबधित अधिकाऱ्यांशी व्यक्तीश: संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. तरीही तक्रारीचे समाधान झाले नाही तर, संबधित विभागाकडे अपील करता येईल, असे सीताराम राणे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये इमारतीच्या पाचव्या माळ्यावरील घराला आग; जीवित हानी नाही

तक्रारदाराला मुभा

या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारदार ज्या शहरात राहत आहे, त्याची तक्रार त्या शहरातच नोंदवली जाणार. तसेच एखादा तक्रारदार दुसऱ्या जिल्ह्यात असेल तर, तो तेथून ही ज्या ठिकाणी तो राहत आहे. तेथील तक्रार पोर्टलवर नोंदवू शकतो.

गृहनिर्माण सोसायटय़ांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तक्रार निवारण जलद व्हावे. या हेतुने सहकार संवादह्ण या पोर्टलच्या माध्यमातुन सहकार विभाग गृहनिर्माण सोसायटय़ाच्या दारी आले आहे. तेव्हा, सोसायटय़ांनी पोर्टलवर थेट तक्रार करून तक्रारीचे निवारण करून घ्यावे.  – अनिल कवडे, सहकार आयुक्त.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooperative communication portal for housing societies by maharashtra state housing federation thane amy