|| किशोर कोकणे

ठाणे : करोना रुग्णांची संख्या वाढू लागताच ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी राज्य सरकारचा हवाला देत वेगवेगळी नियमावली लागू केली आहे. त्यांतील काही नियमांमुळे नागरिकांना वसाहतींच्या बाहेर पडणे कठीण जाणार असल्याने त्यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठाणे महापालिकेसह भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही करोना प्रतिबंधासाठी मनमानेल तशी निर्बंधावली लागू केली आहे. इमारतीच्या मजल्यावर एक रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला प्रतिबंधित करणे, मजल्यावरील सर्व रहिवाशांची चाचणी करणे, इमारतीत १० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करणे असे अतक्र्य निर्बंध ठाणे महापालिकेने लागू केले आहेत. कल्याण – डोंबिवली महापालिकेनेही ठाणे महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकले आहे. भिवंडी महापालिकेने मुख्यालयाची दारे नागरिकांसाठी बंद केली असून ऑनलाईन तक्रारी, अर्ज करण्याचे बंधन घातले आहे.

ठाणे महापालिकेच्या निर्बंधांबाबत गृहनिर्माण संस्थांमध्ये तीव्र प्रतिक्रिया  उमटू लागल्या आहेत. एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारतीतील सर्वांनाच प्रतिजन चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणीचे अहवाल येईपर्यंत प्रतिबंधित इमारत, संकुल बंद ठेवण्यात येईल, असेही ठाणे महापालिकेच्या नियमावलीत म्हटले आहे. एका रुग्णामुळे संपूर्ण मजला प्रतिबंधित करण्याचा नियम इतर कुटुंबांसाठी डोकेदुखीचा ठरणार असून कामानिमित्ताने बाहेर पडणेही अनेकांना कठीण होऊन बसणार आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये तीन, चार, पाच मजल्यांच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये उद् वाहनाची व्यवस्था नाही. त्यामुळे पहिला मजला प्रतिबंधित झाल्यास त्यावरील मजल्यावरील रहिवासी खाली कसे उतरणार असा सवाल गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकारी विचारत आहेत. परंतु महापालिका अधिकारी मात्र याविषयी मूग गिळून बसले आहेत.

भिवंडी महापालिकेत प्रवेश बंद

भिवंडी महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी महापालिका मुख्यालयाची दारे नागरिकांसाठी बंद केली आहेत. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी इ-मेलद्वारे कराव्यात असे आवाहन केले आहे. गरज असल्यास महापालिकेत बैठका आयोजित करण्याची परवानगी असेल. महापालिकेच्या या निर्णयामुळेही प्रचंड नाराजीचा सूर भिवंडीकरांमध्ये दिसून येत आहे. हे सर्व नियम शासन आदेशानुसारच आखण्यात आले आहेत असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.

दहा रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येणार असेल तर त्या इमारतीमधील सर्व नागरिकांना घरीच बसावे लागेल. दहा रुग्णांसाठी शेकडो रहिवाशांना वेठीस धरणे अयोग्य. महापालिकेचा हा निर्णय तर्कशुद्ध नाही.  – सीताराम राणे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा को- हार्ऊंसग सोसायटी फेडरेशन.