ठाणे : ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल ठाणे न्यायालयाने राखून ठेवला आहे. ३ मार्चला या जामीन अर्जावर न्यायालय निकाल देणार आहे. तर, याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही पदाधिकाऱ्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण चारही आरोपींना जामीन

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. या मारहाणी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकाला मारहाण, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विशंत गायकवाड या चौघांना अटक करण्यात आली होती. ठाणे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. मंगळवारी त्याची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या चारही जणांना प्रत्येकी २५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर, आव्हाड यांच्या जामीन अर्जावर ३ मार्चला न्यायाधीश निकाल देणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court to give judgment on pre arrest bail to jitendra awhad in tmc official assault case zws