Kokan nagar govinda pathak in thane : ठाण्याला जशी दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते. तसेच मुंबईतील जोगेश्वरी येथील जय-जवान गोविंदा पथक आणि माझगाव येथील ताडवाडी गोविंदा पथकांना त्यांच्या शिस्तबद्ध मानवी मनोरे रचण्याच्या पद्धतीला ओळखले जात होते. जय-जवान पथकाला गोविंदा पथकातील उपनगरचा राजा म्हटले जात होते. परंतु शनिवारी झालेल्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम रचला. अनेकवर्ष गोविंदा पथकांकडून १० थर रचण्याचा प्रयत्न होत होता. परंतु आज हा विश्वविक्रम मोडला गेला आहे. विशेष म्हणजे, हे पथक देखील जोगेश्वरीचेच आहे.

ठाणे शहरातील वर्तकनगर भागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीमध्ये सकाळपासूनच मुंबई, ठाण्यातील पथक थर रचण्यासाठी येत होते. यामध्ये शनिवारी दुपारीच बाजी मारली ती जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने. या पथकाने तब्बल १० थर रचले.

कोकण नगर गोविंदा पथक आहे तरी कोण ?

जोगेश्वरी येथील कोकण नगर भागात हे गोविंदा पथक आहे. ३८ वर्षीय विवेक कोचरेकर हे या पथकाचे प्रशिक्षक आहेत. मागील १२ वर्षांपासून ते या पथकात कार्यरत असून प्रशिक्षण देत आहेत. हे पथक येथील जुन्या पथकांपैकी एक आहे. हे पथक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने थर रचण्यात प्रसिद्ध आहेत. २०१२ मध्ये त्यांनी सात थर लावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आठ थरांचा सराव केला. परंतु हंड्यामध्ये सहभागी होताना सात थर लावण्यास यशस्वी ठरत होते. २०१५ मध्ये जय-जवान, ताडवाडी आणि आणखी एक पथक नऊ थर लावण्यासाठी प्रसिद्ध झाले होते.

निर्बंध लागले अन् झोपून नऊ थर लावले

  • दहीहंडीच्या थरावर उच्च न्यायालयाने निर्बंध लागल्याने गोविंदा पथकांतील सदस्य विचार करत होते. परंतु कोकण नगर गोविंदा पथकाने अचानक रस्त्यावर झोपून नऊ थर लावले आणि माध्यमांना आकर्षित केले. २०१९ मध्ये या पथकाने ठाण्यात येऊन चार वेळा नऊ थराचा प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी होऊ शकले नव्हते. कोरोनानंतर २०२२ मध्ये त्यांनी ठाण्यात नऊ थर लावून विश्व विक्रमाची बरोबरी केली होती.
    रेकाॅर्ड मोडला
  • शनिवारी दहीहंडीचे आयोजन केले असताना संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीला कोकण नगर गोविंदा पथक दाखल झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी १० थर रचून विश्वविक्रम घडविला.