ठाणे : भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील आणखी तिघांचे मृतदेह रविवारी ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आता सहा झाली. तर, एका व्यक्तीला २० तासांनंतर ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधाकर गवई (३४), प्रवीण चौधरी (२२) आणि त्रिवेणी यादव (४०) अशी मृतांची नावे आहेत. तर, सुनील पिसाळ (४२) या घटनेत बचावले.

वळपाडा येथील कैलासनगर परिसरात वर्धमान कंपाऊंड परिसरात तळ अधिक तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळली. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल, ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांची पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेत होते. शनिवारी रात्री पथकाने नवनाथ सावंत, ललिता महोतो आणि सोना कोरी यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तर, नऊ जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकले असल्याने पथकांकडून शोध कार्य सुरूच होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री घटनास्थळाला भेट दिली.

दरम्यान, रविवारी सकाळी शोध कार्य सुरू असताना ढिगाऱ्याखाली अडकलेले सुनील पिसाळ यांना सुखरूप बाहेर काढण्यात पथकांना यश आले. त्यानंतर सुधाकर, प्रवीण आणि त्रिवेणी यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. परंतु या तिघांचा मृत्यू झाला होता.

नारपोली पोलिसांनी इमारतीचा मालक इंद्रपाल पाटील याला अटक केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी ‘दुसरा जन्म’.. 

सुनील पिसाळ यांचा रविवारी वाढदिवस होता. ढिगाऱ्याखालून बाहेर येताच त्यांना अश्रू अनावर झाले. ‘‘ढिगाऱ्याखाली असताना जगण्यासाठी धडपडत होतो. परंतु नातेवाईक आणि मित्रांच्या आशीर्वादामुळे जगलो’’, अशी भावना  पिसाळ यांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death toll rises to six in bhiwandi building collapse zws