डोंबिवली : येथील नांदिवली पंचानंद भागातील डॉन बॉस्को शाळेमागील बेकायदा सात माळ्याची राधाई कॉम्प्लेक्स इमारत शुक्रवारी भुईसपाट करण्याची कारवाई पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने पोलीस बंदोबस्तात सुरू केली. ही इमारत तोडताना पुन्हा कोणी राजकीय अडथळा आणला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा आणि पालिका, ठाणे पोलीस आयुक्तांनी नियोजन करून ही इमारत तोडण्याचे आदेश दिले असल्याने विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांसह रहिवासी पुढे आले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधाईमधील १३ रहिवाशांनी रात्रीतून आपले सामान इतरत्राच्या भाड्याच्या घरात हलविले. पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली ६० पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेच्या २० तोडकाम पथकाचे कामगारांनी चार क्रॅकर यंत्र यांच्या साहाय्याने इमारतीचे स्लॅब, आधार खांब तोडण्यास सुरुवात केली. लोकसत्ताने या बेकायदा इमारतीच्या सातत्याने बातम्या दिल्या होत्या.

हेही वाचा…डोंबिवलीत देवीचापाडा येथील महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

या कारवाईला विरोध केला तर उच्च न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल या भीतीने रहिवाशांचा कैवार घेऊन राधाई इमारत तोडकामापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेणारे भाजपचे नंदू परब, संदीप माळी, मनीषा राणे आणि इतर शुक्रवारी गायब होते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या तोडकामाला विरोध करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

श्री स्वस्तिक होम्सचे मयूर रवींद्र भगत यांनी विकास करारनाम्याशी संबंधित भूमाफिया संजय विष्णू पाटील, सचिन विष्णू पाटील, राधाबाई विष्णू पाटील, सुरेश मारूती पाटील यांच्याशी संगनमत करून राधाई बेकायदा इमारत उभारली. गेल्या चार वर्षापासून जयेश म्हात्रे ही बेकायदा इमारत तोडण्यासाठी प्रयत्नशील होते. पालिका अधिकाऱ्यांनी ही इमारत तोडण्यास यापूर्वी टाळाटाळ केल्याने जयेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जयेश म्हात्रे यांची वडिलोपार्जित जमीन हडप करून आरोपी भूमाफियांनी ही बेकायदा उभारली असल्याने न्यायालयाने ती जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले होते.

हेही वाचा…Kalyan Crime News : आईचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता मुलगा, कुठे घडली घटना?

दहा दिवसापूर्वी पालिकेने ही इमारत तोडण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्याची माहिती पालिकेने छायाचित्रांसह प्रतिज्ञापत्रातून न्यायालयात दिली. यावरून उच्च न्यायालय संतप्त झाले होते. न्यायालयाचे आदेश धुडकावून विरोध झाल्याने न्यायालयाने पालिका, पोलीस आयुक्तांना उभे राहून राधाई इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. दोन्ही आयुक्तांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त जगताप यांनी राधाई इमारत भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली आहे.

या इमारतीचे पहिले स्लॅब तोडण्याचे काम सुरू आहे. यानंतर आयरेची साई रेसिडेन्सी, गोळवलीची शुभारंभ बॅक्वेट हॉल इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. जगताप यांनी गावदेवी मंदिराजवळील इमारत यापूर्वी भुईसपाट केली होती.

हेही वाचा…१०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या अमिषाने लाखो गमावले

राधाई इमारत तोडकामाला सुरूवात केली आहे. या इमारतीचे पहिले आतील स्लॅब क्रॅकरने तोडून मग शक्तिमान कापकाम यंत्राने ही इमारत दोन दिवसात भुईसपाट केली जाणार आहे. -चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demolition of illegal radhai complex in dombivli begins amid police security psg