ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा अनोखा उपक्रम

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एसटी कर्मचाऱ्यांसाठी अनोखा प्रयोग महाराष्ट्रात आखण्यात आला आहे. या अभियानांतर्ग खोपट येथील एसटी बस आगारात डिजिटल प्रार्थना फलक बसविण्यात आला असून कर्तव्यावर जाण्यापूर्वी प्रत्येक वाहक आणि चालक यांनी फलक बसविलेल्या खोलीत जाऊन प्रार्थना करून, मगच बस आगारातून बाहेर काढावी. तसेच कर्तव्य बजावताना आपल्या जबाबदारीची जाणीव कायम मनात तेवत रहावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ब्राम्हण उद्योजकांची डोंबिवलीत परिषद, देशातून ९०० उद्योजकांची उपस्थिती

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवासासाठी प्रवाश्यांचा पहिला विश्वास हा एसटी बसवर आहे. आज अनेक खासगी लक्झरी बस धावत असल्या तरी, लालपरी कायमच गाव खेड्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. लहानपणापासून एसटी बसचे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. अनेकांनी गावात जाताना एसटी बसने प्रवास केला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एसटी प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित प्रवास आहे. एसटी बस चालवताना चालक आणि वाहक या दोघांवर मोठी जबाबदारी आहे. छोटी चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे जवळ मोबाईल असल्यास तो बंद ठेवणे महत्वाचे ठरेल. चालकाचे एक सेकंद नजर इकडे तिकडे झाली तर मोठा अनर्थ उद्भवू शकतो. वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असून, पिवळा सिग्नल दिसला की बस थांबवणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात करण्यात आले.

हेही वाचा >>>कल्याण: नौदलाची टी-८० युध्द नौका कल्याण मधील दुर्गाडी किल्ला खाडी किनारी दाखल

प्रादेशिक परिवहन विभागाने एस टी कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल प्रार्थना फलक दिला आहे. यावेळी प्रार्थनेत माझ्या वाहनात बसून प्रवास करणाऱ्या सोबत्यांचे जीवन माझ्या हातात आहे. माझ्या सर्व सोबत्यानी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाची जाण ठेवून पात्र रहाण्याची मला मदत कर. जेणेकरून मी अतिशय कौशल्याने सुरक्षित रित्या वाहन चालवून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवेन. असा आशय दिला आहे. या डिजिटल फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित झाले. चालक आणि वाहक यांना आपल्या जबाबदारीची जाणीव हा फलक करून देणार आहे. आगारातून बस बाहेर काढताना ही प्रार्थना म्हणावी अशी अपेक्षा या कार्यक्रमात व्यक्त करून, महाराष्ट्रात प्रथमच राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा ठाणे आणि ठाणे एसटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रम अंतर्गत एसटी कर्मचारी वर्गासाठी एका मार्ग दर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, एसटी विभाग नियंत्रक विलास राठोड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, प्रसाद नलावडे, गणेश पाटील, शहर वाहतूक शाखेचे सपोनि पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया पूर्वी एसटी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र, गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातांच्या तुलनेत एसटी बस अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. – जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी. ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital prayer board in st agar in thane amy