ठाणे : घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या मार्गावरील आनंदनगर, कासारवडवली आणि गायमुख भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) तीन उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. यातील कासारवडवली या एका उड्डाणपूल उभारणीसाठी मार्गरोधक उभारणे तसेच इतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेली कामे बुधवारपासून सुरू झाली असून मुख्य रस्त्यावरील प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर घोडबंदर मार्ग वर्षभर कोंडीचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांत घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. आजही याठिकाणी गृहप्रकल्प उभारणीची कामे सुरू आहेत. मुंबई उपनगरांपासून ठाणे हे जवळचे शहर असल्याने शासकीय अधिकारी, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांनी घोडबंदर भागात घरे खरेदी केली. या भागाचे झपाट्याने नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. घोडबंदर भागातील मार्गावरून गुजरात, वसई, भिवंडी, उरण येथील जेएनपीटी बंदरात जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सर्वाधिक होत असते. या भागात वडाळा-घाटकोपर-गायमुख या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मार्गिकेच्या निर्माणासाठी घोडबंदर येथील मुख्य मार्गालगत आणि दुभाजकांवर लोखंडी मार्गरोधक बसविण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. याचदरम्यान एखादे वाहन बंद पडले तर कोंडीत भर पडते.

हेही वाचा – कल्याणमधील अखंड वाचन यज्ञाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १२०० हून अधिक वाचकांसह २२ शाळांचा उपक्रमात सहभाग

मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असतानाच एमएमआरडीएने या कामाचा एक भाग म्हणून आनंदनगर, कासारवडवली आणि गायमुख भागात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यातील कासारवडवली उड्डाणपूल निर्माणाच्या हालचालींना वेग आला आहे. बुधवारपासून एमएमआरडीएने प्राथमिक स्तरावर कामास सुरुवात केली आहे. त्यानंतर मुख्य मार्गिकेवर काम केले जाणार आहे. ही कामे येत्या महिन्याभरात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक कोंडीचा परिणाम गायमुख, कासारवडवली आणि आनंदनगर भागासह अंतर्गत मार्गांवर होण्याची शक्यता आहे.

घोडबंदर मार्गावरील उर्वरित दोन पुलांचे काम दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. ही कामे वर्षभर सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभर ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागू शकतो.

हेही वाचा – डायघर घनकचरा प्रकल्पाची चाचणी; प्रकल्पात १५ टन कचऱ्यावर प्रक्रीया; सुरूवातीला बायो सीएनजी गॅसची निर्मिती

कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामापूर्वी येथील सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसांत येथील वाहतूक बदलाचे नियोजन केले जाईल. – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilemma for ghodbunder next month speed up movement for construction of kasarwadvali flyover ssb