ठाणे : उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा ९२.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा कमी लागला असला तरी, यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ९३.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर विज्ञान शाखेचा निकाल ९७.५१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.७० टक्के आणि कला शाखेचा निकाल ८५.९१ टक्के लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी बारावीचा निकाल मूल्यमापनाच्या आधारावर काढण्यात आला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे प्रत्यक्ष पद्धतीने परीक्षा पार पडल्या होत्या. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ चा इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्हाचा निकाल ९२.६७ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला एकूण ९५ हजार ४२० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४२ हजार २९६ मुले, तर ४२ हजार १३५ मुलींचा समावेश आहे. यंदा ग्रामीण भागातील कल्याण तालुका निकालामध्ये आघाडीवर असून या ठिकाणी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.८० टक्के आहे.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

  • यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९७.५१ टक्के निकाल लागला आहे. या शाखेतून ३० हजार ५०२ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • वाणिज्य शाखेचा निकाल ९१.७० टक्के इतका लागला. या शाखेतून ४९ हजार १७७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ४५ हजार ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  • कला शाखेचा निकाल ८५.९१ टक्के लागला असून या शाखेतूून १४ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. यामध्ये ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
  • तांत्रिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल ९०.४७ टक्के लागला असून या शाखेतून ४२ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

(शहर – तालुकानिहाय्य निकाल )

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District xii result girls pass students highest proportion ysh