डोंबिवली – विविध गुन्ह्यांमध्ये डोंबिवलीतील मानपाडा, कल्याणमधील कोळसेवाडी आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल असलेल्या ठाकुर्लीतील रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (५३) यांच्यावर नाशिक येथील एका तरूणीने दोन दिवसापूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एका घटस्फोटित महिलेने सुरेंद्र यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करून त्यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या आदेशावरून तपास सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की ठाकुर्ली भागातील विकासक सुरेंद्र पाटील यांच्या मालकीच्या गाळ्यात आपण एक व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला चांगली गती मिळाली नाही. त्यामुळे तो व्यवसाय आपण आर्थिक नुकसानीमुळे बंद केला. गाळ्यामध्ये काही तांत्रिक यंत्रणा होती. गाळ्यातील ही यंत्रणा परत घेण्यासाठी आपण सुरेंद्र पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गाळ्यातील यंत्रणा परत देण्याचे आश्वासन देत आपल्यावर सुरेंद्र पाटील यांनी लैंंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप महिलेने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

चार दिवसापूर्वी सुरेंद्र पाटील यांनी इन्स्टाग्रमवर ओळख झालेल्या नाशिक येथील एका तरूणीला आपण तुला मुंबई विमानतळावर नोकरीला लावतो असे आमिष दाखवून तिला डोंबिवलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. सुरेंद्र पाटील यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली. आपल्यावर सुरेंद्र व त्यांच्या चालकाने लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार नाशिकच्या पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी सुरेंद्र यांनी आपल्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली होती, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकाराबद्दल सुरेंद्र पाटील यांनी असे काही घडले नसल्याचे ही पैसे काढण्यासाठी दाखल झालेली खोटी तक्रार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. आपण फरार नसुन घरातच आहोत, असे स्पष्ट केले होते.

भोंदु बाबांच्या उपस्थितीत पैशांचा पाऊस, नोटांची उधळण, पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसून रील बनवणे अशा विविध कारनाम्यांमुळे सुरेंद्र पाटील समाज माध्यमांतून प्रसिध्द आहेत. लाखोहून अधिक चाहते त्यांचे समाज माध्यमांवर आहेत.

सुरेंद्र पाटील याच्या शोधासाठी चार विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके मिळालेल्या माहितीप्रमाणे विविध भागात जाऊन त्याचा शोध घेतील. त्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा केली जाईल. अतुल झेंडे, उपायुक्त, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divorced woman files complaint of sexual assault against thakurli reel star surendra patil zws