कल्याण : खोणी पलावा भागात कुटुंबीयांसह राहत असलेले एक डाॅक्टर कपडे खरेदीसाठी कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या वाहनाची काच फोडून कल्याणमधील आग्रा रोड भागात भुरट्या चोरट्याने वाहनातील दहा हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी डाॅक्टरांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
डाॅ. जितेंद्र शिवशरण गुप्ता असे तक्रारदार डाॅक्टरांचे नाव आहे. वाहनाची काच फोडलेले वाहन हे त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. डाॅ. जितेंद्र यांचा कल्याणमध्ये अनमोल गार्डन येथे जानकी ग्लोबल रुग्णालय आहे. शनिवारी संध्याकाळी डाॅ. जितेंद्र गुप्ता आपल्या कुटुंबीयांसह कल्याण पश्चिमेत आग्रा रस्ता येथे आपल्या वाहनातून आले होते. त्यांनी आपले वाहन सन सोमन स्क्वेअर इमारती समोर सार्वजनिक रस्त्यावर उभे केले. वाहनाच्या मागील बाजुला आसनावर एका पिशवीत एक टॅब, आधारकार्ड, वाहन चालक परवाना, एटीएम कार्ड, पॅनकार्ड असा ऐवज आणि महत्वाची कागदपत्रे होती.
वाहनाची चारही बाजुचे दरवाजा यांत्रिक पध्दतीने बंद करून डाॅ. जितेंद्र गुप्ता कुटुंबीयांसह एक कपडा दुकानात कपडे खरेदीसाठी गेले. अर्धा तासाने खरेदी करून डाॅक्टर कुटुंबीय आपल्या वाहनाजवळ परतीसाठी आले. त्यावेळी त्यांना आपल्या वाहनाची मागील काच फोडली असल्याचे दिसले. त्यांनी वाहनाच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर काच फोडून मागील आसनाच्या वरील भागात ठेवलेली कागदपत्रांची पिशवी तेथे नव्हती.
पिशवी वाहनात पडली असेल किंवा वाहनात कोठे असेल म्हणून डाॅक्टरांनी शोध घेतला. पण वाहनात आवश्यक महत्वाची कागदपत्रे, टॅब आढळून आला नाही. आजुबाजुला चौकशी केली. पण कोठेही वाहनातील चोरीला गेलेला ऐवज दिसला नाही. त्यामुळे चोरट्याने वाहनाची पाठमागील काच फोडून वाहनातील ऐवज चोरून नेल्याची खात्री पटल्यावर डाॅ. जितेंद्र गुप्ता यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. आणि अज्ञात चोरट्या विरुध्द तक्रार केली. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
दुचाकीची चोरी
शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर आळीमध्ये राहणारे भालचंद्र नातू गुरुजी आपल्या दुचाकीवरून बाजारपेठेतील अन्नपूर्णा हाॅटेल परिसरात आपल्या श्वानाचे खाद्य खरेदीसाठी आले होते. त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे केले. ते श्वासनाचे खाद्य खरेदीसाठी दुकानात गेले. तेवढ्यात नजर ठेऊन असलेल्या चोरट्याने त्यांचे दुचाकी वाहन चोरून नेले. खाद्य घेऊन परतल्यावर नातू यांना आपली दुचाकी दिसली नाही. त्यामुळे परिसरात पाहणी केली. कोठेही दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी वाहन चोरीप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.