डोंबिवली : विद्यार्थ्यांमधील ज्ञान, विज्ञान कौशल्ये विकसित करणे, त्यांच्या कौशल्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या विचारातून डोंबिवलीतील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी शाळेच्या सभागृहात ज्ञान कौशल्य प्रदर्शन आयोजित केले आहे.

भांडुप येथील एनईएस रतनाम महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख राजीव मिश्रा या प्रदर्शनाचे २२ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन करणार आहेत. यावेळी जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी, प्राचार्या नीलजा पाटील, उपप्राचार्या तृप्ती तोमर आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दिवसाची ही प्रदर्शने विद्यार्थी पालकांसाठी सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड या वेळेत खुली राहणार आहेत.

या प्रदर्शनात ब्लाॅसम शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत गुणांच्या माध्यमातून तयार केलेले पर्यावरण, हवामान, जलसंवर्धन, कृषी, अवकाशातील प्रगती, माहिती आणि तंत्रज्ञानातील विविधांगी प्रयोग सादर केले जाणार आहेत. शिक्षण, क्रीडा, याशिवाय विविध भाषांतर्गत उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपल्यातील अंगभूत कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळावी. त्यांच्या कौशल्य गुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या विचारातून ब्लाॅसम शाळा व्यवस्थापनाने हा उपक्रम आयोजित केला आहे, असे ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्या नीलजा पाटील यांनी सांगितले.