डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेच्या स्वच्छतागृहांमध्ये फेरीवाले आपले सामान पोत्यांमध्ये बांधून ठेवत आहेत. सामानाने भरलेल्या या पोत्यांमुळे स्वच्छतागृहांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची अडचण होत आहे. तसेच, या स्वच्छतागृहांच्या बाजुला गर्दुल्ले, मद्यपी झोपलेले असततात. तसेच स्वच्छतागृहाची देखभाल करणारा कर्मचारी स्वच्छतागृहाच्या खोलीत आराम करत असतो. या वावरामुळे महिला प्रवाशांना स्वच्छतागृहात जाताना अडचणी येत आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फ आणि ग प्रभाग हद्दीतील फेरीवाले फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कारवाई करून हटविले आहेत. तरीही अनेक फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दीडशे मीटरच्या बाहेर व्यवसाय करतात. काही रेल्वे स्थानकापासून दूरवरील रस्त्यावर, अंतर्गत गल्ल्यांमध्ये व्यवसाय करतात. हे फेरीवाले रात्रीच्या वेळेत विक्री व्यवसाय बंद केला की सामान पोत्यात भरून डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेच्या स्वच्छतागृहात आणून ठेवत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांचा सतत पाहरा असतो. रेल्वे स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून रेल्वे सुरक्षा बळाचे जवान रेल्वे स्थानकात दिवस रात्र गस्त घालत असतात. त्यांना रेल्वेच्या स्वच्छतागृहांमध्ये फेरीवाले आपले सामान आणून ठेवतात. स्वच्छतागृह फेरीवाल्यांनी गोदाम करून ठेवले आहे, हे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिसत कसे नाही, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. रेल्वे स्थानक व्यवस्थापकांची रेल्वेच्या मालमत्तेचा कोणी दुरूपयोग करणार नाही ही जबाबदारी आहे. असे असताना रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांची नजर चुकवून रात्रभर फेरीवाले आपले सामान रेल्वेच्या स्वच्छतागृहात गोदामासारखे ठेवत आहेत याविषयी प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
रेल्वे प्रवासी स्वच्छतागृहात गेले की त्यांना वाटेतच फेरीवाल्यांच्या सामानाचा अडथळा येतो. त्याच्या बाजुला मद्यपी, गर्दुल्ले बसलेले असतात. बाजुला स्वच्छतागृह देखभाल करणारा कर्मचारी आराम करत असतो. त्यामुळे स्वच्छतागृहात महिला प्रवासी गेल्या की त्यांचीही अडचण होते. एकीकडे पालिका अधिकारी रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले हटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे रेल्वेचे कर्मचारी फेरीवाल्यांचे सामान रेल्वेच्या स्वच्छतागृहात ठेवण्यास मदत करून फेरीवाल्यांची पाठराखण करत आहेत, अशी टीका प्रवासी करत आहेत.
रेल्वे स्थानकातील मालमत्तेचे संरक्षण आणि त्याची देखभाल ठेवणे हे रेल्वे स्थानकातील प्रत्येक नियंत्रक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. यामध्ये रेल्वे स्थानक व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान येतात. या यंत्रणेला अंधारात ठेऊन फेरीवाले रेल्वेच्या स्वच्छतागृहात आपली सामानाची पोती ठेवतात कशी. संगमनताशिवाय हे शक्य नाही. रेल्वेच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घ्यावी. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.