डोंबिवली : डोंबिवलीत प्रवेश करताना प्रवाशांना, शहराबाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना प्रसन्न वाटावे म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून घरडा सर्कल चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. याच भागात एका व्यापारी संकुलाच्या बाजुला खासदारांच्या प्रयत्नातून एका शिल्प कलाकृतीवर मराठी भाषेची परंपरा, गोडवे गाणाऱ्या देखण्या चित्रकृती उभारण्यात आल्या आहेत. या शिल्प कलाकृतीवरील मराठी भाषेच्या मांडणीत अशुध्द लिखाण, व्याकरणाचा अभाव असून मराठी भाषेची मोडतोड करण्यात आली आहे.
एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून अखंड महाराष्ट्र समाधानी आहे. हे प्रयत्न आम्ही केले म्हणून काही राजकीय मंडळी जोरकसपणे प्रचार करत होती. आता हिंदी भाषा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात आणून मराठीची गळचेपी सुरू असल्याच्या विषयावर राज्यात गहजब सुरू आहे.
अशा सगळ्या परिस्थितीत सांस्कृतिक, साहित्य नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर रिजन्सी अनंतम विको नाका येथून डोंबिवलीत प्रवेश केल्यानंतर पीएनजी गॅलरीओ या व्यापारी संकुल इमारतीच्या कोपऱ्यावर मराठी परंपरेची देखणी शिल्प कलाकृती खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली आहे. या कलाकृतीमध्ये मराठी भाषेची गोडवे गाणारी घोष वाक्य लिहिताना अशुध्द पध्दतीने शब्दांची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थाचा अनर्थ आणि मराठी भाषेची तोडमोड करण्यात आली आहे.
ही देखणी शिल्प कलाकृती नजरेत भरत असतानाच याठिकाणची मराठी भाषेची तोडमोड नागरिकांना अस्वस्थ करत आहे. शिवसेना आमदार, पदाधिकारी, शिवसैनिक दररोज या रस्त्याने जातात त्यांच्याही हा प्रकार निदर्शनास येत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. खासदार डाॅ. शिंदे यांच्या प्रयत्नातून ही शिल्प कलाकृती उभारण्यात आली आहे. आणि त्यात चुका झाल्याने हा विषय समाज माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चेचा झाला आहे.
‘परंपरेचा गुढ्या पताका मिरवतो अंबरी, डोंबिवली आमची सांस्कृतिक नगरी’ असे नजर मारल्यावर मनाला खटकणारे वाक्य दृष्टीस पडत आहे. परंपरेचा ऐवजी परंपरेच्या, मिरवतो ऐवजी मिरवते हे शब्द अभिप्रेत आहेत. डोंबिवली शब्दातील बी वरील वेलांटी तुटल्याने शहराचा उच्चार करताना नागरिकांना अडखळण्यास होत आहे. मराठी भाषेच्या आग्रहाविषयी शासन, प्रत्येक मराठीजन आग्रही असताना डोंबिवली सारख्या सुसंस्कृत, सुशिक्षितांच्या शहरात मराठीची होत असलेली अवेहलना पाहून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. या शिल्प कलाकृतीच्या नियंत्रकांनी दर्शनी भागातील मराठी भाषेच्या मांडणीतील चुका तातडीने दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मराठी भाषेचा सर्वदूर वापर, त्याची शुध्द आणि योग्य मांडणीसाठी प्रत्येक मराठीजनाने आता जागरूक राहिले पाहिजे. आपल्या भाषेचे आपणच रक्षण आणि प्रसार करायचा आहे. त्यामुळे डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहराच्या प्रवेशव्दारावरील शिल्प कलाकृतीमधील मराठीची मोडतोड उचित नाही. त्यात तात्काळ दुरुस्ती व्हावी. – राजू नलावडे, रहिवासी, डोंबिवली.