डोंबिवली – रात्रीच्या वेळेत पेट्रोल पंपावर मोटारी, दुचाकी पेट्रोल भरण्यासाठी घेऊन येणारे काही दुचाकी स्वार तरूण, मोटार कार चालक मद्य सेवन करून येतात. पेट्रोल वाहनात भरून झाले की मग पैसे देण्यावरून पेट्रोल भरणा सेवक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना दमदाटी, मारहाण करून पेट्रोलचे पैसे न देता निघून जातात. या वाढत्या प्रकाराला कंटाळून डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर-गणेशनगर भागातील पेट्रोल पंप मालक सुरेश मोरे यांनी आपला पेट्रोल पंप रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवसाही या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी काही तरूण, इसम आले की ते किरकोळ कारणावरून वाहनात पेट्रोल भरणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. रात्रीच्या वेळेत पुरूष कर्मचारी पेट्रोल पंपावर तैनात असतात. डोंबिवली पश्चिमेत राजूनगर, भागशाळा मैदान भागात पेट्रोल पंप सुरू झाल्यामुळे वाहन चालकांना डोंबिवली एमआयडीसी किंवा अन्य भागात जाण्याचा त्रास कमी झाला आहे.
मागील काही महिन्यांपासून राजूनगर भागातील सुरेश मोरे यांच्या पेट्रोल पंपावर रात्री, मध्यरात्रीच्या वेळेत काही दुचाकी, मोटार कार चालक आपली वाहने पेट्रोल भरण्यासाठी घेऊन येतात. मद्य सेवन केलेले, धुंदीत असलेले हे वाहन चालक पेट्रोल वाहनात भरणा केल्यावर पैसे देताना पेट्रोल भरणा सेवकाशी हुज्जत घालून त्याला मारहाण, दमदाटी करतात. पेट्रोल पंप हे संवेदनशील ठिकाण आहे. याठिकाणी पेट्रोल विक्रीच्या माध्यमातून ग्राहक सेवेतून मिळणारे पैसे जमा झालेले असतात.
मद्य सेवन केलेले वाहन चालक त्याचा विचार न करता पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून आणखी भाई लोक पेट्रोल पंपावर हाणामारी करण्यासाठी बोलावून घेतात. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तुम्ही याठिकाणी बोलू नका, असे कर्मचाऱ्याने सांगुनही ते त्याला तू कोण मला सांगणार, असे बोलून मारायला धावतात. हा वाद सुरू असताना वाहनात पेट्रोल भरले आहे त्याचे पैसे देण्यास मद्य धुंद वाहन चालक पैसे देण्यास तयार होत नाहीत.
रात्रीच्या वेळेत तीन ते चार कर्मचारी पेट्रोल पंपावर तैनात असतात. मोटार वाहनात पाच ते सहा गुंड प्रवृत्तीचे लोक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले असतात. हे लोक कर्मचाऱ्याशी वाद घालून समुहाने कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याची शक्यता असते. या हाणामारीत एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण शक्यता आहे. हा सगळा विचार करून आपल्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेत मद्य सेवकांकडून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन पेट्रोल पंप मालक सुरेश मोरे यांनी आपला राजूनगर भागातील पेट्रोल पंप रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा फलक त्यांनी पेट्रोल पंपाच्या प्रवेशव्दारावर लावला आहे. मद्य सेवकांच्या कृतीचा इतर वाहन चालकांना नाहक त्रास होणार असल्याने इतर प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.