Thane News: ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम गणेश गडकरी रंगायतनचे नुतनीकरण करून त्याला नवी झळाली देण्यात आली असून त्यापाठोपाठ आता मानपाडा भागातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या दुरुस्ती कामाला सुरूवात होणार असून या कामासाठी चार ते पाच महिने लागणार असले तरी, टप्प्याटप्प्याने ही कामे केली जाणार असल्याने नाट्यगृह बंद ठेवावे लागणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
ठाणे येथील मानपाडा भागातील हिरानंदानी मेडोज परिसरात डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. ठाणे महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीआधील नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले होते. लोकार्पणानंतरच काही महिन्यात नाट्यगृहाच्या छताचे प्लास्टर ऑफ पॅरिसचा भाग कोसळला होता. या दुरुस्ती कामासाठी दिड वर्षे नाट्यगृह बंद होते. यावरून पालिकेच्या कारभारावर टिकाही झाली होती. यामुळे दुरुस्तीनंतर लगेचच घाणेकर नाटय़गृह प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर या नाटय़गृहातील लघुनाटय़गृहातील छतामधून पाणी गळती सुरू झाली होती.
दुरुस्तीच्या कामासाठी लघुनाटय़गृह बंद ठेवण्यात आले होते. हे काम संपत नाही तोच, पावसाळ्यात पुन्हा मुख्य छतातुन पाणी गळती सुरू झाली होती, ती पालिकेने तात्पुरत्या स्वरुपात बंद केली होती. १५ वर्षे जुने बांधकाम असून त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. यामुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित होत आहेत. आता नाट्यगृहाच्या छतातून पाणी गळती होत असून यासह इतर दुरुस्ती कामासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून आता नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
नाट्यगृहाची माहीती
ठाण्यातील मध्यवर्ती भागात गडकरी रंगायतन आहे. मात्र घोडबंदर भागातील रसिकांसाठी नाट्यगृह असावे या उद्देशातून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. हिरानंदानी बिल्डर्स यांच्या माध्यमातून सुमारे ६० कोटी खर्चून हे नाट्यगृह उभारण्यात आले. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी हे नाट्यगृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मुख्य नाट्यगृहाची आसनक्षमता सुमारे १०९५ तर लघुनाट्यगृहाची क्षमता १८२ इतकी आहे.
ही दुरुस्ती कामे केली जाणार
नाट्यगृहाच्या दुरुस्तीदरम्यान, संपूर्ण वास्तूची डागडुजी, तुटलेल्या खुर्च्यां बदलणे, पडदे बदलणे, शौचालये दुरुस्ती, व्हीआयपी कक्ष दुरुस्ती, कार्पेट बदलणे, सुरक्षा कॅबिन दुरुस्ती, वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक आणि अंतर्गत सुविधांची सुधारणा करणे, आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी चार ते पाच महिने लागणार असले तरी, टप्प्याटप्प्याने ही कामे केली जाणार असल्याने नाट्यगृह बंद ठेवावे लागणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
कलाकार आणि नाट्य रसिकांना चांगला सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, असे उपायुक्त उमेश बिरारी यांनी सांगितले.
