ठाणे : मद्य पिऊन रेल्वे प्रवास करणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले. मद्य प्यायल्यानंतर प्रवासी रेल्वेगाडीतच झोपला. झोपेतून उठला त्यावेळी रेल्वेगाडी यार्डात होती आणि त्याकडील बॅग देखील गायब झाली होती. बॅगेमध्ये त्यांच्या मौल्यवान वस्तू होत्या. अखेर चार दिवसांनी त्या प्रवाशाने याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अनेकांना मद्य पिऊन प्रवास करण्याची सवय आहे. परंतु ही सवय किती महागडी पडू शकते हे या उदाहरणावरून तुम्हाला कळू शकेल. यातील तक्रारदार २८ वर्षीय असून तो ठाणे शहराजवळील कळवा येथे वास्तव्यास आहे. तो ठाण्यातील एका अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये कामाला आहे. ११ नोव्हेंबरला तो नवी मुंबई येथील जुईनगर भागात कामानिमित्ताने गेला होता. काम आटोपल्यानंतर त्याने जुईनगर भागात मित्रांसोबत मद्य पार्टी केली. त्यानंतर तो रात्री ११.२० वाजता पुन्हा उपनगरीय रेल्वेगाडीने ठाणे येथे येण्यास निघाला. त्यावेळी त्याने रेल्वेगाडीच्या प्रथम वर्ग (फस्ट क्लास) डब्यातून प्रवास सुरु केला.
क्षणार्धात सर्व मौल्यवान वस्तू गायब – रेल्वे डब्यात प्रवेश केल्यानंतर मद्य प्यायले असल्याने त्या प्रवाशाला अचानक झोप लागली. त्यावेळी त्याच्या मांडीवर त्याची बॅग होती. १२ नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता त्याला जाग आली असता, बॅग गायब असल्याचे दिसले. तसेच रेल्वेगाडी देखील यार्डात उभी होती. त्याने बॅगेचा सर्वत्र शोध घेतला. परंतु बॅग आढळून आली नाही.
अखेर १५ नोव्हेंबरला त्याने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या बॅगेमध्ये ५३ हजार ५०० रुपये किमीतीचा लॅपटाॅप, १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तीन हजार रुपये किमतीचे हेडसेट, चार्जर असा एकूण ७४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
