कल्याण – कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महेश गायकवाड शिंदे प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गायकवाड यांनी या विषयावर थेट स्पष्टीकरण दिले नसले तरी, आपण कल्याण पूर्वेतील विकास कामांच्या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली असल्याचे माध्यमांना सांगितले.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीपुर्वी कल्याण, डोंबिवलीतील शिंदे शिवसेनेची फळी तगडी असली पाहिजे या विचारातून मागील काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीतील विविध पक्षांमधील पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते पक्षात घेण्याचा सपाटा शिंदे शिवसेनेने लावला आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांना पक्षात घेऊन शिंदे शिवसेनेने राष्ट्रवादी पक्षाला जोरदार झटका दिला. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येणाऱ्या काळात विकास हवा असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसेल या दृष्टीने कल्याण शहर परिसर भाजपमय करून टाका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या इशाऱ्यामुळे शिंदे शिवसेनेत अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिंदे शिवसेनेत घेण्याची मोहीम पक्षाने उघडली आहे. विधानसभा निवडणूक काळात कल्याण पूर्वेत कोणालाही उमेदवारी द्या, आपल्यावर गोळीबार करणाऱ्या माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या घरात उमेदवारी देऊ नका, असे आवाहन करूनही भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले. आपल्या विरोधकाच्या घरात उमेदवारी दिल्याने शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द निवडणूक लढवली होती.

शिंदे शिवसेना आणि महेश गायकवाड यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पण, पडद्यामागून गायकवाड यांना शिंदे शिवसेनेची प्रबळ साथ असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणूक काळात शक्तिप्रदर्शन करून महेश यांनी महायुतीला घाम फोडला होता. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी महेश गायकवाड यांच्या सारखा खंदा कार्यकर्ता आपल्या पक्षात हवा अशी शिंदे शिवसेनेचीही भूमिका आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांच्या इतका समर्पित भावाने काम करणारा कार्यकर्ता कल्याण पूर्वेत नसल्याचे जाहीरपणे बोलून दाखविले होते.

पालिका निवडणुका चार प्रभाग पध्दतीने होणार आहेत. त्यात पक्षीय पाठबळही महत्वाचे आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेत जाहीरप्रमाणे प्रवेश करून नेहमीप्रमाणे कामाला लागायचे असा विचार करून महेश यांनी ही भेट घेतल्याची शिंदे शिवसेनेत चर्चा आहे. शिंदे शिवसेनेच्या यापूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमात महेश यांचा हिरीरिने सहभाग दिसला आहे.

कल्याण पूर्वेतील विकास कामांच्या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही सदिच्छा भेट होती. – महेश गायकवाडमाजी नगरसेवक.