ठाणे : ठाण्यातील उपवन तलाव परिसर हा नागरिकांच्या फिरण्यासाठी आवडता ठिकाण असून या परिसरत नेहमीच नागरिकांची गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षांत येथे अशा प्रकारच्या बुडण्याच्या काही घटना घडल्याने सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाचप्रकारचे रविवारी रात्री उपवन तलावात ५८ वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध उपवन तलावात रविवारी रात्री एक व्यक्ती तलावात बुडाला. याबाबत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला रात्री सुमारे ८.५८ वाजता मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षामार्फत माहिती प्राप्त झाली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान, वर्तकनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबवून पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.
५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
अनिल फकीरराव दवसे (५८) असे उपवन तलावात बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते भीमनगर, वर्तकनगर परिसरात राहतात. घटनेच्या वेळी अग्निशमन दलाकडून एक फायर वाहन आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. प्राथमिक तपासानुसार ही घटना अपघाती असल्याचे समोर आले असून, वर्तकनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह
ठाण्यातील उपवन तलाव परिसर हा नागरिकांच्या फिरण्यासाठी आवडता ठिकाण असून या परिसरत नेहमीच नागरिकांची गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षांत येथे अशा प्रकारच्या बुडण्याच्या काही घटना घडल्याने सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तलावाभोवती सुरक्षारक्षक आणि सावधानता फलकांची गरज आहे.
