कल्याण : एकेकाळचे खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखले जाणारा दिवा, मुंब्रा परिसर खारफुटीची बेसुमार कत्तलमुळे ओसाड होत चालला आहे. दिवा-साबे ते मुंब्रा भागातील हरितपट्ट्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि मातीचे भराव सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दिवा ते मुंब्रा दरम्यानच्या साबे भागात खारफुटीच्या हरितपट्ट्यावर कचऱ्याचा भराव टाकला जात आहे. या भरावाच्या आडोशाने भूमाफिया कचऱ्याच्या भरावावर मातीचा भराव करून बेकायदा बांधकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. या भरावाच्या बाजुला सुरूवातीला झोपड्या बांधायच्या. तेथे कोणी लक्ष देत नाही, असे निदर्शनास आले की त्याठिकाणी पक्क्या चाळीची बेकायदा बांधकामे करायची अशी भूमाफियांची कार्यपद्धत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

कचऱ्याच्या ढीगाचा काही भाग मुंब्रा खाडीच्या किनारी समतल करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात कचरा, मातीच्या भरावातील पाणी पावसाळ्यात मुंब्रा खाडीत वाहून जाऊन खाडी प्रदूषित होईल. या भागातील विविध प्रकारची जैवविविधता या भरावांमुळे नष्ट होत चालली आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

मुंबईनंतर सर्वाधिक जैवविविधता आढळणारा डोंबिवली, दिवा, भिवंडी, कल्याण खाडी किनारा परिसर आहे. या भागातील खाडी किनारा भागात बेकायदा चाळींसाठी मातीचे भराव करून या भागातील जैवविविधता माफियांनी नष्ट केली आहे. वाळू माफियांनी खारफुटीची झाडे नष्ट करून जैवविविधतेला धोका निर्माण केला आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. दिवा, मुंब्रा हा खारफुटीचा जंगलपट्टा आहे. या भागातील अस्तित्वातील खारफुटीचे जंगल संवर्धित करणे गरजेचे आहे. याऊलट दिवा, साबे, मुंब्रा भागातील खारफुटीच्या हरितपट्ट्यांवर कचऱ्याचे भराव करून भूमाफियांना बेकायदा बा्ंधकामांसाठी मोकळे रान करून दिले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमींनी केल्या.

शासन, न्यायालय हरितपट्ट्यांच्या संवर्धनांसाठी अधिक संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत दिवा, साबे परिसरात खारफुटी आणि जैवविविधतेचा मोठा पट्टा कचरा भराव करून नष्ट केला जात असताना सर्व प्रशासन यंत्रणा याविषयी गुपचिळी धरून बसल्याने निसर्ग छायाचित्रकार, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिळफाटा, मुंंब्रा, दिवा परिसर नागरीकरणाने वेढला आहे. या भागात पर्यावरणाचा विचार करून हरितपट्ट्यांचीही गरज आहे. अस्तित्वातील पट्टे नष्ट करून त्यानंतर वृक्षारोपणाचे गोडवे गाण्या काहीच अर्थ नाही, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

वातावरणाचा समतोल राखण्यात खारफुटीची जंगले महत्वाची भूमिका बजावतात. विविध प्रकारची जैवविविधता या जंगलांमुळे अधिवास करून राहते. निसर्ग, पक्षी, पर्यावरणप्रेमींना या खारफुटी जंगलांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जैवविविधतेचा अभ्यास करता येतो. हीच जंगलेच आता भराव, बेकायदे बांधकाम करून नष्ट करण्यात येत आहेत. हे गंभीर आहे. शांभवी चव्हाण पर्यावरण विशेषज्ञ,

मुंबई दिवा-साबे-मुंब्रा पट्ट्यात खारफुटीचे जंंगल, हरितपट्ट्यावर करण्यात येत असलेल्या कचरा, माती भरावाची आम्ही शासनाच्या वरिष्ठ स्तरावर तक्रार केली आहे. शासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली नाहीतर आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करू. हेमंत कारखानीस पर्यावरण अभ्यासक, मुंबई.