नववधूच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवी. पूर्वी लग्न झालेल्या स्त्रियाच केवळ पायातील जोडवी घालत असत. आता काळ बदलला आहे. कुठलाही दागिना घालण्याचा किंवा न घालण्याचा लग्न हेच निमित्त नसावे असा तरुणींचा आग्रह असतो. त्यामुळे जोडवी हे एक आभूषण असून ते लग्न न झालेल्या मुलीही आता सर्रास परिधान करू लागल्या आहेत. दोन वेढय़ांची नक्षी असलेली जोडवी आता मागे पडली असून सुबक अशी कोरीव नक्षीकाम केलेली जोडवी घालण्याकडे मुलींचा कल वाढत आहे. अगदी जीन्स पँटवरही हा दागिना घातला जात असून कधी तो मुलींच्या हातातील अंगठी होतो तर कधी पायातील जोडवी. जोडव्यांची फॅशन विविध रूपानं पुढे येत असून केवळ एका पायातही ती घातली जात आहेत. जोडव्यांची निराळी नजाकतच तुमच्या पायाचे सौंदर्य खुलवत असून सर्वानी वापरून पाहावी अशी ही फॅशन आहे.
मंगळसूत्र, हिरव्या बांगडय़ा, लाल कुंकू आणि जोडवी असे दागिने मुलींच्या अंगावर दिसले म्हणजे ती विवाहित आहे असे समजले जाते. परंतु आपण विवाहित आहोत किंवा नाहीत हे अशा पद्धतीने सांगावेच का लागते असे प्रश्न आजच्या तरुणींना पडायला लागले आहेत. त्यामुळे अनेकींनी ही बंधने झुगारून लावली तर काहींनी या बंधनांनाच वेगळ्या पद्धतीने पाहात त्यांची वेगळीच फॅशन केली. यातच सौभाग्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या जोडव्याचाही समावेश झालेला पाहावयास मिळतो. पूर्वी लग्न झालेल्या मुलीच्याच पायातील बोटांत दोन, पाच, सात वेढय़ांची जोडवी पाहायला मिळायची. लग्न न झालेल्या मुलींनी पायात जोडवी घालूनही पाहिली तरी घरातील मोठे लोक त्यांना ओरडायचे. अशी जोडवी घालून पाहू नये, लग्न लवकर होत नाही अशी भोळी समजूत त्यापाठी होती. कालांतराने महिला नोकरी-धंद्यानिमित्त घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांच्या पेहरावातही बदल झालेला दिसून आला. रोजच्या धावपळीत गैरसोय होते म्हणून अनेक तरुणींनी लग्नानंतरही मंगळसूत्र किंवा जोडवी घालणे टाळलं. पण त्याच पारंपरिक जोडव्यांना आधुनिक थाटात टो रिंग म्हणून आल्यावर अनेक मुलींना इन थिंग वाटू लागल्या. आणि लग्न झालेल्या तरुणींसोबतच लग्न न झालेल्या मुलींनीही त्यांना आपल्या पायातील बोटांत महत्त्वाचे स्थान दिले.
पूर्वीच्या काळी स्त्रिया या चांदीची सुट्टी जोडवी वापरत असत, त्यांचा आकारही मोठा असून ती वजनानेही जड असत. अशी जोडवी घालण्यामागे शास्त्रीय कारण असल्याचे त्या सांगत असत. त्यानंतर दोन वेढय़ांची, पाच वेढय़ांची, सात वेढय़ांच्या जोडव्यांची फॅशन बाजारात आली. नववधू आपल्या पायातील बोटांच्या आकारावर ही वेढय़ांच्या जोडव्यांची निवड करू लागल्या. कोणाची लांबसडक बोटे असतील तर त्यांच्या बोटांत सात वेढय़ांची जोडवी शोभून दिसत असत. परंतू काही वधूंची बोटे लहान असतील तर त्यांचे मन होऊनही त्यांना लांबलचक अशा सात वेढय़ांची जोडवी घालता येत नसत. महिला नोकरीनिमित्त घराबाहेर पडू लागल्या, त्यांनी सलवार कुर्ता घालणे सुरू केल्यावर त्यांना पायातील ही मोठी जोडवी ऑड फॅशन वाटू लागली. त्यामुळे काहींनी ही जोडवी न घालणेच पसंत केले तर काहींनी गुजराती महिलांच्या जोडव्यांना पसंती दिली. गुजराती महिला या वेढय़ांची जोडवी न घालता नक्षीकाम केलेल्या नाजूक जोडवी घालतात. मराठी महिलांनीही या जोडव्यांना पसंती दर्शविली. आणि कालपरत्वे जोडव्यांच्या आकारात आणि वजनात बदल होत गेला. आता कमी वजनाची नाजूक विविध आकारांची मणी, खडे, घुंगरू, मिनाकाम अशा अनेक आकारांत व वजनात जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. जोडव्यांना वरच्या बाजूला लहान घुंगरे जोडली की त्याला गेंद किंवा विंचू असे म्हटले जाते. हा दागिना पायाच्या करंगुळीत घातला जातो. परंतु आता अंगठय़ाच्या बाजूच्या बोटातही तरुणी हा दागिना घालताना दिसतात. जय मल्हार मालिकेतील बानू, म्हाळसा यांच्या पायातील जोडव्यांनाही तरुणींनी पसंती दिली. लग्नसराईच्या दिवसांत अनेक नववधू तरुणींनी सराफांना खास तसे नक्षीकाम असलेले जोडवी बनवून देण्याची गळ घातली. तसेच नुकताच प्रसिद्ध झालेला बाजीराव मस्तानी या चित्रपटातील काशीच्या दागिन्यांनाही पसंती दिली गेली. प्रियंका चोप्राने परिधान केलेल्या पारंपरिक आभूषणांमध्ये जोडव्यांनाही प्रसिद्धी मिळाली असून अनेक तरुणींनी तसे दागिने खरेदी केलेले बाजारात दिसून आले. राजकोट, गुजरात, राजस्थान येथील जोडव्यांच्या नक्षीकामांना तरुणींची विशेष पसंती असल्याचे दुकानदार सांगतात.
या नाजूक जोडव्यांचे आकर्षण महाविद्यालयीन तरुणींना पडणार नाही असे होणारच नाही. सुरुवातीला महाविद्यालयातील साडी डेला साडी परिधान केल्यावर फॅशन म्हणून मुलींनी जोडवी घालण्यास सुरुवात केली. परंतु ही जोडवी अंगठय़ाच्या बाजूच्या बोटात न घालता ती तिसऱ्या बोटात घालण्यास प्राधान्य दिल्याने तरुणींच्या आयांनीही मुलींच्या या फॅशनला मूकसंमती दिली. सलवार, कुर्ता, लेहंगा यावर ही जोडवी पायात शोभून तर दिसतात, परंतु जीन्स पँटवरही तुम्हाला ही हटके लुक देतात. जीन्सवर मुली केवळ एकाच पायात जोडवी घालण्यास प्राधान्य देतात.
पूर्वी चांदीची जोडवी पायात घातली जात असत, आता यात मेटलची, स्टीलची जोडवीही बाजारातच काय अगदी ट्रेनमधील फेरीवाल्यांकडेही सहज मिळत आहेत. २० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यंत या जोडव्यांची किंमत असून सर्वसामान्यांना ती परवडण्यासारखी आहेत. यात शिरेवाली, वेणीवाली, स्प्रिंग जोडवी, स्टोनच्या बिचव्या, वेणीच्या बिचव्या, मीना वर्कच्या बिचव्या आकर्षण ठरत आहेत. हीच जोडवी कधी हातातील बोटांमधील अंगठी म्हणून शोभत आहेत तर कधी पायातील जोडवे.
अधिक महिन्यात जोडव्यांना महत्त्व
अधिक मासाचे महत्त्व हिंदू धर्मशास्त्रामध्ये मोठे मानले जाते. या महिन्यात जावई व लेकीला अधिकमासाचे वाण दिले जाते. जावयाला विष्णू तर मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. मुलीला चांदीची भांडी, जोडवी दिली जातात. त्यांना वाण दिल्याने मोठे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.
* किंमत – २० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत
* कोठे मिळतील –
फडके रोड, मानपाडा रोड, राजाजी पथ, मधुबन टॉकीज गल्ली, दीनदयाळ रोड, घनश्याम गुप्ते रोड – डोंबिवली, शिवाजी चौक – कल्याण, गावदेवी मार्केट, राममारुती रोड – ठाणे</p>