कल्याण – डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील बालाजी गार्डन इमारतीच्या बाजुला असलेल्या साई गॅलेक्सी या ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक आर. भगत यांनी बनावट सात बारा उतारा आणि बनावट बिनशेती आदेशाचा वापर करून सह दुय्यम निबंधक कल्याण १ कार्यालयातून खरेदीखत दस्त नोंदणी करून घेतले आहे, असा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला. विकासक शालीक भगत यांनी शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहितेने कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना दिले आहेत. शालीक भगत यांनी कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ चार पाख्यांची १६० सदनिकांची महारेरा प्रकरणातील सात माळ्याच्या इमारती उभारल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून डोंबिवलीत बेकायदा इमारत उभारणाऱ्या विकासकांना महसूल विभागाने हा पहिलाच दणका दिला आहे. डोंबिवलीतील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ६५ बेकायदा इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या विकासक, मध्यस्थ, दस्त नोंदणी दलाल, या बेकायदा बांधकामांना जबाबदार कल्याण डोंबिवली पालिका, महसूल, दस्त नोंदणी, शासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी, प्रांत विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे केली आहे.

मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालाप्रमाणे तहसीलदार शेजाळ यांना डोंबिवली आयरेतील साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक भगत यांनी खरेदी खतासाठी वसंत गौतम व इतर यांच्या नावे असलेल्या भूधारणा वर्ग दोन या कुळ कायद्याने प्राप्त जमीन सात बारा उताऱ्याचा (स. क्र. २९-५-अ, क्षेत्र १५ गुंठे) नियमबाह्य वापर केल्याचे आढळले. या सात बारा उतारा, बनावट बिनशेती आदेशद्वारे भगत यांनी खरेदीखत करून शासनाची फसवणूक केली आहे,असे आढळले.

भगत यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान करून आयरे येथील स. क्र. २९-५-अ या १५ गुंठे क्षेत्राचे सह दुय्यम निबंधक कल्याण १ कार्यालयात ८ आक्टोबर २०२० रोजी ५९६९-२०२० या दस्त नोंदणीचे खरेदी खत तयार करून महसूल विभागाची दिशाभूल केली, असा ठपका ठेवत तहसीलदार शेजाळ यांनी अशा स्वरुपाच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाई करून जरब बसावी यासाठी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार यांंनी बनावट सात बारा उताऱ्याचा वापर करून दस्त नोंदणीकृत खरेदी खत केले आहे. त्यांनी शासनाची फसवणूक, दिशाभूल केली म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी पोलिसांना कळविले आहे. इतर बेकायदा इमारतींच्या कागदपत्रांची आम्ही तपासणी करत आहोत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.- सचिन शेजाळ, तहसीलादर, कल्याण.

६५ बेकायदा इमारत प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आपण महसूल, पोलीस यंत्रणांना केली आहे. त्याची कारवाई आता सुरू झाली आहे. लवकरच याप्रकरणातील म्होरके अटक होतील.- दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: File a case against shalik bhagat partner of sai galaxy in dombivli ayre kalyan news amy