लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून रिजन्सी गृहसंकुल, दावडी, गोळवली, सोनारपाडा दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पाच ते दहा रूपयांची वाढ केली आहे. रिक्षा संघटना, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही वाढ करण्यात आल्याने प्रवासी या वाढीव भाडेवाढीवरून रिक्षा चालकांशी वाद घालत आहेत. ही वाढ तात्काळ रद्द करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पी. पी. चेंबर्स मॉल ते सर्वेश सभागृह दरम्यान ‘एमएमआरडीए’तर्फे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ते मार्ग मागील वीस दिवसांपासून बंद आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा चालकांना या बंद रस्त्यामुळे मानपाडा रस्त्याने चार रस्त्यावरून किंवा कस्तुरी प्लाझा समोरून टाटा लाईन रस्त्याने मानव कल्याण केंद्र येथून टिळक रस्त्याने रिजन्सी, दावडी, गोळवली भागात वळसा घेऊन जावे लागते.

आणखी वाचा-डोंबिवलीत देवीचापाडा येथे पडदे लावून बेकायदा चाळीची उभारणी, राजकीय दबावामुळे कारवाईत अडथळा

हा वळसा घेताना अनेक वेळा चार रस्ता, मानपाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. या वळशामुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील गोळवली, दावडी, सोनारपाडा, रिजन्सी गृहसंकुल भागात जाणाऱ्या रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून वाढीव पाच ते दहा रूपये घेण्यास सुरूवात केली आहे. डोंबिवली पूर्व ते रिजन्सी गृहसंकुल प्रवाशांकडून भागीदारी (शेअर) प्रवास पध्दतीने २० रूपये आकारले जातात. आता रिक्षा चालक पाच ते दहा रूपये वाढीव भाडे आकारत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

घराजवळ उतरल्यावर रिक्षा चालक प्रवाशांकडून वाढीव भाड्याची मागणी करत आहेत. यावरून चालक आणि प्रवाशांमध्ये वाद सुरू झाले आहेत. रस्ते कामामुळे घेण्यात येणारा वळसा एक ते दोन किलोमीटरचा नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी वाढीव भाडे आकारू नये, अशी प्रवाशांची मागणी आहे. रिक्षा संघटना आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-पडघा टोल नाक्यावर वाहनांच्या दीड किलोमीटर रांगा, टोल कर्मचाऱ्यांची खासदार बाळ्या मामा म्हात्रेंकडून खरडपट्टी

गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांनी अचानक प्रवासी भाडे वाढ केल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात आपणास माहिती नाही. यासंदर्भात रिक्षा चालकांची एक बैठक घेण्यात येईल. एक फलक रिक्षा वाहनतळावर लिहून वाढीव भाडे का आकारले जाते. याविषयी माहिती देऊन रिक्षा चालक, प्रवाशांंमधील गैरसमज दूर केले जातील. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी वाढीव भाड्यावरून वाद घालू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या जातील. -काळू कोमास्कर, अध्यक्ष, लालबावटी रिक्षा संघटना.

डोंबिवलीत रिक्षा चालकांनी अचानक भाडेवाढ केली असेल तर त्याठिकाणी भरारी पथक पाठवून माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. -आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forcefully fare hike by rickshaw drivers going to regency golavli davdi in dombivli mrj