कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी भिवंडी कोन गावमधील एका इसमाची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. ही बनावट कागदपत्रे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालात सादर करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील आरोपीला जामीन मिळवून दिल्याचा प्रकार आता वर्षभरानंतर कल्याण न्यायालयात उघडकीला आला आहे.
याप्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाची फसवणूक झाल्याने न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयातील पहिले न्यायालय यांच्या कार्यालयातील साहाय्यक अधीक्षक वृषाली दिनेश चव्हाण यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार केली आहे. साहाय्यक अधीक्षक वृषाली चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भिवंडी कोन गावमधील रहिवासी फिरोज सलीम कुरेशी आणि बलराज बलवंत सिंग (३५) यांच्या विरूध्द तक्रार केली आहे. बलराज हा हरियाणा राज्यातील सिहार जिल्ह्यातील हुंडा हांंसी भागातील रहिवासी आहे. १३ मे २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या कालावधीत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हा फसवणुकीचा प्रकरा घडला आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी दाखल एका गुन्ह्यात बलराज बसवंत सिंग (३५) हा आरोपी आहे. याप्रकरणात पोलिसांनी चौकशी करून बलराजला अटक केली आहे. त्याच्या विरूध्द न्यायालयीन कार्यवाहीची प्रक्रिया करण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी बलराजला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात जामिनासाठी हजर केले होते.
या जामीन प्रक्रियेसाठी बलराज आणि जामीनदार फिरोज कुरेशी यांनी संगनमत करून झटपट जामीन मिळावा यासाठी फिरोजची बनावट कागदपत्रे तयार केली. हे सर्व बनावट, बोगस कागद, दस्तऐवज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी सादर केले. बलराज सिंग या आरोपीच्या जामिनासाठी कागदपत्रे दाखल झाल्याने न्यायालयाने या कागदपत्रांची पडताळणी करून बलराज सिंगला गेल्या वर्षी मे मध्ये जामीन मंजूर केला.
न्यायालयाने अलीकडे केलेल्या पडताळणीमध्ये बलराज सिंगला जामीन दिलेली कागदपत्रे बनावट आणि बोगस दस्तऐवज असल्याचे तपासात उघड झाले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे बलराज सिंग याने फिरोज कुरेशी याच्या साहाय्याने न्यायालयातून जामीन मिळवून घेतला. हे न्यायालयाच्या निदर्शनास येताच याप्रकरणी न्यायालयाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील आरोपी बलराज आणि बनावट कागदपत्रे तयार करणारा त्याचा जामीनदार फिरोज यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस उपनिरीक्षक घाटगे याप्रकरणाचा तपास करत आहेत.