बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील भाजपचे दोन महत्वाचे नेते असलेले वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार किसन कथोरे यांच्यात गेल्या अनेक वर्ष सुप्त संघर्षाची चर्चा होती. मात्र बुधवारी मुंबईत सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर झालेल्या एका बैठकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातील वन विभागाच्या समस्या माझ्यापर्यंत यायला नकोत, ते प्रश्न तत्काळ तिकडेच सोडवा, असे स्पष्ट आदेश नाईक यांनी दिले. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाईक यांनी ‘आस्थेने’ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेला हा ‘सज्जड दम’ दोन्ही नेत्यांतील नव्या सौहार्दाची ‘नांदी’ असल्याचे बोलले जाते आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील माळशेज घाट परिसर विकसित करणे, कल्याण मुरबाड माळशेज घाट रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे, पाच लघु पाटबंधारे योजनांची रखडलेली कामे, लहान लहान रस्त्याची कामे याबाबत वन विभागाच्या येणाऱ्या अडचणी आणि समस्या याबाबत बुधवारी सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर विशेष बैठक पार पडली. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. सोबतच वन विभागाचे सचिव, उपवन संरक्षक आणि वन भागाच्या इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.

यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना वन विभागाच्या येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचला. यावेळी वन मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्याचे मुख्य वनसंरक्षकांना याबाबत जाब विचारला.

त्यावर बोलताना सबंधित अधिकाऱ्यांनी, आपल्याकडून काहीच अडचण नसल्याचे सांगितले. त्यावर मंत्री नाईक यांनी, अडचण नाही मग सहा -सहा महिने फाईल्स का आपल्याकडे ठेवल्या आहेत. आपण का परवानग्या देत नाहीत असे विचारले. त्यावर बोलताना मुख्यवन संरक्षक ठाणे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या रखडलेल्या फाईल उद्याच मार्गी लावू असे सांगितले. मंत्री नाईक यांनीही या फाईल मार्गी लावू मला अवगत करा, असे स्पष्ट आदेश दिले.

माझ्यापर्यंत अडचणी यायलाच नको….

वन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना मुरबाड मतदारसंघातील वन विभागाच्या कोणत्याही अडचणी माझ्यापर्यंत येता कामा नये, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी आपल्या समाज माध्यम खात्यावरील पोस्ट मध्ये दिली आहे. त्यांची कामे तातडीने मार्गी लावा असे आदेश नाईक यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता मुरबाड मतदारसंघातील रस्त्यांची कामे, लघु पाटबंधारे योजना, माळशेज घाट परिसर विकास, माळशेज घाटातील काचेचा स्काय वॉल्क आणि वन विभागातील संबंधित इतर विकास कामे मार्गी लागतील, अशी आशा आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे.

संबंध सुधारण्याची नांदी ?

आमदार किसन कथोरे आणि वन मंत्री गणेश नाईक हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र होते. त्यानंतर काही कालावधीत दोघांनी भाजपात प्रवेश केला. नाईक यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. किसन कथोरे सुद्धा वरिष्ठ आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा अनेकदा रंगली होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्यात मंत्रिपदाची जी शर्यत होती त्या शर्यतीत गणेश नाईक आणि आमदार किसन कथोरे आमनेसामने होते अशीही चर्चा रंगली होती.

भाजपच्या कोट्यातून गणेश नाईक यांना संधी मिळाली. तर किसन कथोरे यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागली. यानंतर एका कार्यक्रमात बदलापुरात आलेल्या नाईक यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना महापौर पदाची संधी मिळेल अशी घोषणाच करून टाकली होती. त्यानंतर आमदार किसन कथोरे आणि समर्थकांत नाराजी पसरली होती. त्यावेळी किसन कथोरे यांनी नाईक यांच्यावर बोलणे टाळले होते. मात्र म्हात्रे यांच्यावर टीकास्त्र सोडत नाईक यांनाही अप्रत्यक्ष लक्ष्य केले होते.

बदलापुरात भाजप आणि शिवसेनेत उघड संघर्ष आहे. या संघर्षात भाजप मंत्र्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल वक्तव्य केल्याने भाजप आणि विशेषत म्हात्रे यांचे विरोधक असलेल्या किसन कथोरे गटात नाराजी होती. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने नाईक आणि आमदार किसन कथोरे यांच्यात नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात नाईक यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना किसन कथोरे यांच्यासाठी दिलेला सज्जड दम हाही चर्चेचा विषय रंगला आहे.