डोंंबिवली : डोंबिवली पूर्व रामनगर भागात पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान मुंबई, नवी मुंबई परिसरातून वाहनाने वृत्तपत्रांचे गठ्ठे विक्रीसाठी येतात. या वाहनांमधील वृत्तपत्रांचे गठ्ठे रामनगर भागातील पदपथावर अनेक वर्षापासून उतरविले जातात. आणि चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली शहर परिसरातील किरकोळ वृत्तपत्र विक्रेते ही वृत्तपत्र ताब्यात घेण्यासाठी येतात. अलीकडे काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचरा वाहू चार ते पाच गाड्या याठिकाणी उभ्या राहतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेत असह्य दुर्गंधी या भागात पसरते. या भागात वृत्तपत्र वितरण आणि विक्री करणे असह्य होते, अशा तक्रारी रामनगर वृत्तपत्र साठा विक्री केंद्रावरील वृत्तपत्र विक्रेत्यांनी केल्या आहेत.
मागील अनेक वर्षापासून डोंबिवली शहर परिसरातील वृत्तपत्र विक्रीचे गठ्ठे रामनगर साठा केंद्रावर पहाटे तीन ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान वृत्तपत्र विक्री करणाऱ्या वृत्तपत्र वितरकांकडून उतरवले जातात. या साठा केंद्रावर वृत्तपत्रांमध्ये पुरवण्या टाकणे, वृत्तपत्र गठ्ठयांमधील वृत्तपत्रांचे किरकोळ विक्रेत्याप्रमाणे वर्गीकरण करून ठेवणे. ही कामे एक ते दीड तास साठा केंद्रावरील कर्मचारी करतात.
गेल्या काही दिवसांपासून रामनगर भागात ज्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रीचे गठ्ठे उतरविले जातात. त्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर पालिकेच्या कचरा वाहू गाड्या उभ्या असतात. या वाहनांमधून कचऱ्यातील सांडपाणी रस्त्यावर गळत असते. तसेच या वाहनांमधून असह्य अशी दुर्गंधी परिसरात पसरते. पाऊस सुरू आहे. पावसामुळे कचरा वाहू वाहनात पावसाचे पाणी पडून ते सांडपाणी वाहनातून रस्त्यावर पडते आणि पावसामुळे परिसरात पसरते.
कचरा वाहू वाहनातून येणारी दुर्गंधी आणि रस्त्यावर पडलेल्या सांडपाण्यातील दुर्गंधीमुळे या भागात पहाटेच्या वेळेत वृत्तपत्र साठा केंद्रावर काम करणारे कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते त्रस्त होतात. तोंडाला रुमाल बांधुनही दुर्गंधीचा त्रास कमी होत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाने ही कचरा वाहून रेल्वे स्थानक परिसरात किंवा ज्या ठिकाणी मनुष्य वावर नाही त्या ठिकाणी उभी करावीत, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांची आहे.
पहाटेच्या वेळेत रस्त्यावर अनेक ठिकाणी अंधार असतो. त्यामुळे वर्तमानपत्राचे गठ्ठे उचलून अन्य भागात नेऊन त्याची विगतवारी करणे वृत्तपत्र विक्रेत्यांना शक्य नसते. दररोजची ही दुर्गंधी सहन करावी लागत असल्याने काही वृत्तपत्र विक्रेते सर्दी, खोकल्याने आजारी पडले आहेत. वृत्तपत्र विक्रीचा रामनगर हा अनेक वर्षांचा महत्वाचा नाका आहे. त्यामुळे या भागात कचरा वाहू वाहने उभी राहणार नाहीत. वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रास होणार नाही, याची काळजी पालिकेच्या घनकचरा विभागाने घ्यावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे.