ठाणे : मुंबई, पालघर, ठाणे तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील घाट रस्त्याची दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी सायंकाळी पुर्ण केले. या कामानंतर गेले सहा दिवस बंद असलेला गायमुख घाट रस्ता जड-अवजड वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे इतर पर्यायी मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २६ एप्रिलच्या रात्रीपासून हाती घेण्यात आले होते. या दुरुस्ती कामासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील वाहतूक मार्गात मोठे बदल लागू केले होते. त्याबाबतची अधिसुचनाही काढली होती. २९ एप्रिलपर्यंत हे काम सुरू राहणार होते. तोपर्यंत हे वाहतूक बदल लागू केले होते. या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली होती. मात्र, वाहनांचा भार वाढल्याने पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडून पडले आणि शहरात कोंडी झाली होती. यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आणि यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली होती. मात्र, घोडबंदर मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळविल्याने या शहरात कोंडी होत होती.
दरम्यान, २९ एप्रिलची मुदत संपत आली तरी, गायमुख घाट रस्त्याचे काम पुर्ण झाले नव्हते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी दोन दिवस म्हणजेच, १ मे पर्यंत मुदत मागितली होती. ही मुदत वाहतुक विभागाने देत वाहतूक बदल १ मेपर्यंत कायम ठेवले होते. तशी अधिसुचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली होती. या मुदतीत म्हणजेच गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजता बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती काम पुर्ण केले असून यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्वरत करण्यात आली.
सीजीबीएम पद्धतीने रस्ते बांधणी
गायमुख घाट परिसरातील रस्त्यावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता डांबरी आहे. हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु वनविभागाची परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबरी रस्ता तयार करावा लागत आहे. मात्र, हा रस्ता पावसाळ्यात उखडतो. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम सिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स (सीजीबीएम) या पद्धतीने केले आहे. या पद्धतीनुसार याठिकाणी आधी डांबरी रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर त्यावर केमिकल मिश्रीत काँक्रीटचा थर टाकण्यात आला. पाचशे मीटरच्या रस्त्याची सीजीबीएम पद्धतीने रस्ते दुरुस्ती करण्यात आली आहे.
गायमुख घाट मार्ग दुरुस्तीचे काम गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजता पुर्ण झाले. यामुळे या कामासाठी लागू केलेले वाहतूक बदल रद्द करून पुर्वीप्रमाणे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. – पंकज शिरसाटउपायुक्त, ठाणे वाहतूक पोलिस